नामजप सत्संग ऐकणार्‍यांनी प्रत्यक्ष साधनेला आरंभ करणे, हीच या कार्यक्रमाची खरी फलनिष्पत्ती !

‘नामजप सत्संग’ ऑनलाईन कार्यक्रमाच्या द्विशतकपूर्ती निमित्ताने संदेश

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांचे ‘यू-ट्यूब चॅनेल’ अन् ‘फेसबूक पेज’ यांवर प्रतिदिन प्रसारित होत असलेला ‘नामजप सत्संग’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे २०० भाग पूर्ण झाल्याचे ऐकून आनंद झाला. या सत्संगामुळे सहस्रो लोक ‘नामजप साधना’ करू लागले आहेत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. अध्यात्मात प्रत्यक्ष कृतीला महत्त्व आहे. नामजप सत्संगात तात्त्विक माहिती सांगण्यासह प्रत्यक्ष नामजपही करण्यासाठी वेळ दिला जातो. सत्संगात ‘ऑनलाईन’ उपस्थित असलेले सर्व जण या वेळेत नामजप करतात, म्हणजे प्रत्यक्ष साधना करतात. हीच या कार्यक्रमाची खरी फलनिष्पत्ती आहे.

या सत्संगात सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या उपस्थितीत नामजप केला जातो. त्यामुळे अनेकांना आध्यात्मिक स्तरावरील अनुभूती येत आहेत. उच्च पातळीच्या संतांच्या उपस्थितीत नामजप करण्याचे लाभ प्रत्यक्ष ‘नामजप सत्संगा’मुळे अनुभवता येत आहेत.

सत्संगाला येणार्‍या सर्वांनी नामजप साधनेसह अध्यात्मातील पुढच्या पुढच्या टप्प्याची साधना करण्यासाठी आता प्रयत्न करायला हवेत. सत्सेवा म्हणजे धर्मसेवा करणे, सत्कार्यासाठी, म्हणजेच धर्मकार्यासाठी तन-मन-धनाचा त्याग करणे; नामजप साधनेचा, म्हणजेच अध्यात्माचा प्रसार करणे; या कृती करणे म्हणजे पुढच्या टप्प्याची साधना आहे. आपल्या सर्वांना ही पुढच्या टप्प्याची साधना करण्याची बुद्धी लाभो, ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था.