निसर्गप्रकोप ते आपत्काळ !

खरेतर जून ते सप्टेंबर हा पावसाचा काळ असतो आणि ऑक्टोबरमध्ये उन्हाचा तडाखा सहन करावा लागतो; पण सध्या महाराष्ट्रात पावसाचे गणितच कोलमडले आहे. ‘परतीचा पाऊस पडत आहे’, असे म्हटले जात आहे; पण हा पाऊस परतीचा नसून सर्वत्र जणू जुलैसारखी अतीवृष्टीच होत आहे. गेले २ दिवस कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. हातातोंडाशी आलेली पिके कोलमडून गेली. सोयाबीन, मूग, ऊस आणि भात आदी पिकांची प्रचंड हानी झाली. कापसाची बोंडेही खराब झाली. काढून ठेवलेली पिकेही पुराच्या पाण्यात डोळ्यांसमोर वाहून गेली. पाणीच पाणी झालेल्या शेतात तर आता पिके दिसतच नाहीत. ‘जणू हिरव्यागार रानाला ही अतीवृष्टी शाप ठरली कि काय ?’, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना भेडसावत आहे.

 

घाम गाळून कष्ट करून हिरवेगार रान फुलवणारा शेतकरी आज सर्वत्र झालेल्या ओल्या दुष्काळामुळे आसवे गाळत आहे, हानीभरपाईची मागणी करत आहे, पंचनाम्याची आस धरून बसला आहे. निसर्गाने पावसाच्या रौद्ररूपात केलेली हानी पहाता किती शेतकर्‍यांची आसवे पुसली जातील कुणास ठाऊक ? कोणताही दुष्काळ हा शेतकर्‍यांसाठी कर्दनकाळच ठरतो, मग तो ओला असो किंवा कोरडा दुष्काळ ! दिवाळी तर आता अगदी ऐन तोंडावर आली आहे. असे असतांना या पावसाने समस्त शेतकरी वर्गाचे दिवाळेच काढले आहे. यंदा शेतकरी ‘गोड दिवाळी’ साजरी तरी करू शकेल का ? तीन पक्ष सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने राज्यावर आलेल्या या पावसाच्या ‘महा’संकटाचा सामना करून हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. त्यांच्या साहाय्याला तत्परतेने धावून जायला हवे. या अस्मानी संकटात आताच शेतकर्‍यांना साहाय्याचा हात दिला नाही, तर त्याची परिणती आत्महत्यांमध्ये होऊ शकते. सरकारने हे जाणून भविष्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तत्परतेने पावले उचलणे आवश्यक आहे.

आपत्काळाची चाहूल !

महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाचे संकट ‘आ’ वासून उभे आहे. दुसरीकडे अतीवृष्टीच्या माध्यमातून निसर्गाच्या प्रकोपाला सर्वांना सामोरे जावे लागत आहे. ही अतीवृष्टी केवळ शेतकर्‍यांसाठीच तापदायक ठरली असे नाही, तर शहरांमध्येही या पावसाचे उग्र रूप पहायला मिळाले. नद्या-नाले इतके तुडुंब भरले की, शेवटी ते पाणी अनेक महामार्गांवर आले. महामार्गावर सर्वत्र पाणी साठल्याने काही वेळ तेथील वाहतूकही बंद करण्याची वेळ ओढवली. काही धबधब्यांच्या ठिकाणी असणारा पाण्याचा मोठा प्रवाह जणू अक्राळविक्राळच भासत होता. पुणे शहराने तर मागील वर्षीही वादळी पाऊस अनुभवला असल्याने अनेकांना धडकी भरली होती. तेव्हा अनेकांच्या चारचाकी गाड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने यंदा तसे होऊ नये, यासाठी अनेक नागरिक इमारतींच्या ठिकाणी लावलेल्या गाड्या दुसरीकडे ठेवण्यासाठी जात होते. ‘पुणे तेथे काय उणे’, याप्रमाणे पुण्यातील नागरिकांकडे असणार्‍या चारचाकींची वाढलेली संख्या पहाता त्या कुठे ठेवायच्या (पार्क करायच्या)? असाच सर्वांसमोर प्रश्‍न होता. अडीच घंटे वीजपुरवठा खंडित झाल्यावर काय होते, हे मुंबईने तर अनुभवलेच; पण पावसामुळे पुण्यातील संपूर्ण सिंहगड रस्ता परिसरातील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. पंढरपुरातील चंद्रभागेलाही पूर आला. खरेतर समुद्रसपाटीपासून पुष्कळ उंच असणारे जिल्हे, शहरे यांनी इतकी वर्षे कधीही पूरसदृश स्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुभवली नव्हती. गेल्या काही वर्षांपासून तेथे पुराचा तडाखा बसत आहे. ‘वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईडचे प्रमाण वाढत असल्याने हवामानात अशा स्वरूपाचे अनाकलनीय पालट होत आहेत’, असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. निसर्गचक्रात ढवळाढवळ न झाल्यास अनर्थ ओढवत नाही; मात्र निसर्गाचे चक्र बिघडण्यास मानवाला असणारा प्रगतीचा विकृत हव्यास आणि अत्याधिक लालसा कारणीभूत आहे. ‘वैज्ञानिक कारणाच्या जोडीला पाश्‍चात्त्य जीवनशैलीचे मोठ्या प्रमाणात केले जाणारे अंधानुकरण, धर्माचरणाचा र्‍हास, संस्कृतीचे होणारे अधःपतन हे आपल्याला वेगाने विनाशाकडे घेऊन जात आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या सर्वांची परिणती शेवटी अस्मानी-सुलतानी संकटांमध्ये होत असते, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.

मानवाने शहाणे व्हावे !

कोरोनासमवेत मार्गक्रमण करतांना प्रतिदिन एकतरी नवे संकट आज राज्याच्या नागरिकांसमोर उभे रहातच आहे. ‘असे कसे होऊ शकते ?’, ‘इतक्या वर्षांत तर आम्ही असे कधी अनुभवले नव्हते ?, मग आताच हे असे का होत आहे ?’ ‘हे सर्व कधी संपणार ?’, असे अनेकविध प्रश्‍न मनात येत आहेत. या सर्वांचे एकमेव उत्तर म्हणजे येणारा भीषण आणि भयावह आपत्काळ हेच आहे. आपत्काळाने कोरोना महामारीच्या माध्यमातून संकटांची मालिका चालू केली आहे. ती आता थांबणार नाही. आपत्काळाला तोंड द्यायचे असेल, तर भगवंताची आराधना करण्यावाचून तरणोपाय नाही, हेही तितकेच खरे ! बुद्धीमत्तेची मर्दुमकी गाजवणार्‍या आणि केवळ विज्ञानाच्या आधारावर जीवन जगणार्‍या मानवाने आतातरी शहाणे व्हावे. काही घटना घडतात, थोडे वातावरण निवळते आणि मग पुन्हा एखादे संकट मग ते कोणत्याही प्रकारचे का असेना, डोके वर काढते, असे सध्याचे चित्र आहे. येत्या काळात तर प्रत्येक दिवस हा आपत्कालीन स्थितीतच काढावा लागणार आहे. पूर्वीच्या राज्यकर्त्यांकडे दूरदृष्टी असल्याने ते भविष्यात येणार्‍या संकटांच्या दृष्टीने सतर्कतेने पावले उचलायचे आणि जनतेचे रक्षण करायचे. सध्याच्या राजकीय नेत्यांमध्ये दूरदृष्टीचा अभाव जाणवतो. त्यामुळे आतापर्यंत घडलेल्या आपत्तीजनक परिस्थितींमधून सरकार, प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यातील समन्वयाचा अभावच दिसून आला. निसर्ग विविध प्रकारे सूचना देऊन मानवाला सतर्क करू पहात आहे. शत्रूराष्ट्रे तर कधी एकदा युद्धाची ठिणगी पडते आणि आपण भारतावर आक्रमण करतो, अशा सिद्धतेतच आहेत. असे असतांना ‘सध्याच्या घटना म्हणजे ईश्‍वराचे स्मरणपत्र आहे’, असे मानून सतर्क व्हा आणि आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी साधनेची कास धरा !