धार्मिक भावना दुखावणार्‍या घरमालकास कायदेशीर नोटीस बजावल्यावर २४ घंट्यांत देवतांची चित्रे काढली !

घराच्या आवारातील भिंतीवर देवतांची चित्रे लावून धार्मिक भावना दुखावणार्‍या घरमालकास अधिवक्ता अमृतेश यांची कायदेशीर नोटीस बजावल्यावर २४ घंट्यांत चित्रे काढली !

बेंगळुरू – येथील पॅलेस क्रॉस रोड येथे सी.आर्. सुब्रह्मण्यम् यांच्या घराच्या आवारातील भिंतीवर रस्त्याच्या बाजूने देवतांची चित्रे लावण्यात आली आहेत. यामुळे  हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. यामुळे कर्नाटक उच्च न्यायालयातील अधिवक्ते आणि अधिवक्ता संघटनेचे कार्यकारिणी सदस्य अधिवक्ता एन्.पी. अमृतेश यांनी कायदेशीर नोटीस बजावून सुब्रह्मण्यम् यांनी भारतीय दंड विधानाच्या कलम २९५अ नुसार गुन्हा केल्याचे निदर्शनास आणून दिले. यानंतर पुढील २४ घंट्यांत सुब्रह्मण्यम् यांनी भिंतीवर लावलेली देवतांची चित्रे काढून टाकली.

नाेटिस पाठवण्यापुर्वी भिंतीवर लावलेली देवतांची चित्रे

 अधिवक्ता एन्.पी. अमृतेश यांनी सुब्रह्मण्यम् यांना पाठवलेल्या नोटिशीत म्हटले होते की,

१. काही दिवसांपूर्वी मी उच्च न्यायालय ते माझे मल्लेश्‍वरम् येथील कार्यालय असा प्रवास करतांना तुमच्या घराच्या आवारातील भिंतीवर रस्त्याच्या बाजूने श्री महागणपति, श्री महालक्ष्मी देवी, साईबाबा आदी देवता आणि संत यांची चित्रे लावण्यात आल्याचे माझ्या पहाण्यात आले. ही चित्रे भिंतीवर वरून खालपर्यंत लावण्यात आली आहेत. त्यामागे तुमचा उद्देश भिंतीवर कुणी लघुशंका करू नये, असा स्पष्ट होतो.

२. त्यामुळे तुम्ही घराच्या आवारातील भिंतीचे संरक्षण करण्यासाठी अशी चित्रे लावून देवतांचा अवमान केला आहे, असे दिसून येते. त्यामुळे हिंदूंच्या देवतांचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावनांना दुखावल्या आहेत.

३. या देवतांच्या चित्रांची तुम्ही पूजा करता, असा कोणताही पुरावा दिसून आला नाही. म्हणजेच केवळ स्वतःच्या हितासाठी आपण हिंदूंच्या श्रद्धास्थानांची विटंबना केली आहे.

४. या देवतांच्या चित्रांच्या ठिकाणी आपण जर आपल्या पूर्वजांची चित्रे लावली असती, तर आपल्याला काय वाटले असते, याचा विचार आपण करायला हवा होता.

५. तरी आपण ही नोटीस प्राप्त झाल्यापासून २४ घंट्यांच्या आत वरील सर्व देवतांची चित्रे काढून टाकावी. अन्यथा आपल्या विरुद्ध उचित न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी खटला प्रविष्ट करण्यात येईल.

नाेटिस पाठवल्यानंतर काढण्यात आलेली भिंतीवरील देवतांची चित्रे