स्वकियांची अस्मिता !

आगरा येथील ‘मोगल म्युझियम’चे नाव पालटण्याची सिद्धता चालू झाली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे, ‘‘उत्तरप्रदेशमध्ये गुलामीच्या खुणांना स्थान नाही ! आमचे नेते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे आगरा येथील संग्रहालय आता ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या नावाने ओळखले जाईल.’’ उत्तरप्रदेश सरकार जे अनेक चांगले पालट करत आहे, त्यांपैकीच हा एक आहे. त्यामुळे निश्‍चितच तो स्वागतार्ह आहे. मोदी शासन आल्यानंतर काही रस्ते, रेल्वेस्थानके, शहरे, विमानतळे यांची परकीय नावे पालटून स्वकियांची अस्मिता जागृत करणे चालू झाले; परंतु अशी अनेक प्राचीन इतिहास असलेली शहरे भारतात आहेत, जी अद्यापही मोगल अथवा ब्रिटीश राजवटीच्या खुणा अंगावर मिरवत आहेत. समस्त भारतियांसाठी ही लज्जास्पद गोष्ट आहे. देशभक्त हिंदूंच्या मनातील ही वेदना आहे. देहलीतील ‘औरंगजेब’ रस्त्याचे नाव ‘कलाम रस्ता’ झाले, ही त्यांपैकी एक जखमेवर झालेली मलमपट्टी आहे. ‘या महाक्रूरकर्म्यांच्या किती खुणा भारत आणखी किती काळ मिरवत रहाणार ?’, असा प्रश्‍न देशभक्तांच्या मनात सातत्याने असतो. त्या पार्श्‍वभूमीवर वरील गोष्ट समाधानकारक आहे.

योगी यांनी हेही करावे !

उत्तरप्रदेशातील आगरा येथील लाल किल्ल्यामध्ये महाकपटी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करून ठेवले होते. छत्रपतींनी अत्यंत कडेकोट बंदोबस्त असतांना या किल्ल्यातून पुत्र संभाजीराजांसह त्यांची करून घेतलेली सुटका हा अक्षरशः चमत्कारच होता. ‘आगर्‍याहून सुटका आणि त्यानंतर अडीच सहस्र किलोमीटर प्रवास करून औरंगजेबाच्या सर्वदूर पसरलेल्या सैन्याच्या तावडीतून सहीसलामत सुटून अल्पावधीत राजगडावर पोचणे’, ही अतार्किक वाटावी, अशी गोष्ट होती. मराठ्यांच्याच काय विश्‍वाच्या इतिहासात हा प्रसंग सैन्य प्रशिक्षणाच्या दृष्टीने अनेकार्थाने अधोरेखित करण्यासारखा आहे. कोणताही मराठी माणूस आगरा ओळखतो, तो छत्रपतींच्या ‘आगर्‍याहून सुटके’साठीच. आज तिथे देश-विदेशातील सहस्रो पर्यटक प्रतिदिन जातात; मात्र दुर्दैवाने या किल्ल्यात ‘हा’ इतिहास कुठे घडला, छत्रपतींना अनेक मास कुठे कैद केले होते, त्यांची सुटका कशी झाली ? याविषयीच्या माहितीचा साधा उल्लेखही कुणाला आढळत नाही. इथला एकही ‘गाईड’ याविषयी पर्यटकांना काहीही माहिती देत नाही. सर्व पर्यटकांना लक्षावधी हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या क्रूर औरंगजेबाचा इतिहास मात्र रंगवून सांगितला जातो, जो येथील पाट्यांवर लिहिलेला आहे. त्यामुळे विदेशी किंवा काही तरुण पर्यटकांना वाटते ‘मोगल हेच भारतावर राज्य करणारे राजे होते.’ हिंदूंची वीरता आणि शौर्य यांमुळे झाकोळले जाते; किंबहुना हे भारताचा इतिहासच पालटल्याप्रमाणे होते.

हिंदु संस्कृतीचे पुरस्कर्ते योगी आदित्यनाथ यांनी ताजमहालच्या उजव्या बाजूकडील दारात असलेल्या मोगल संग्रहालयाचे नवनिर्माण करण्याचे कार्य हाती घेतले आहे. या नव्या संग्रहालयात तरी आगर्‍याच्या लाल किल्ल्यातील छत्रपती शिवरायांच्या सुटकेच्या अतुलनीय पराक्रमाची कहाणी मोठ्या फलकावर लिहिली जाऊन लाल किल्ल्यातील छत्रपतींच्या खुणा असलेल्या स्थानाविषयी पर्यटकांना माहिती मिळेल, अशी आशा धरायला हरकत नाही. सुटकेच्या संपूर्ण प्रसंगाची चित्रे किंवा चलचित्रे येथे दाखवली, तर हिंदूंचे स्फुलिंग चेतवले जाईल. येथील किल्ल्याच्या बाहेर छत्रपतींचा अश्‍वारूढ पुतळा आहे; परंतु सर्वत्र मोगलांच्या खुणा असणार्‍या या शहरात सत्य इतिहासच बाहेर न आल्यामुळे ‘या पुतळ्याचा आणि किल्ल्याचा संबंध काय ?’, असा प्रश्‍न कुणालाही पडत नाही. याचा अर्थाअर्थी संबंध जोडून या जनतेसमोर आणला जावा, अशी आता अपेक्षा आहे. या किल्ल्यात छत्रपतींना कैद केले होते, त्या भागात सैन्याचे कार्यालय करून तो भाग पूर्ण बंद करण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने कदाचित् ते चांगलेही असेल; पण निदान संग्रहालयाच्या माध्यमातून इतिहास समोर आला, तर सत्य इतिहास पर्यटकांना कळेल.

लढा अस्मितेचा !

उत्तराखंड राज्यातील डेहराडून रेल्वेस्थानकाचा उर्दू भाषेत नाव असलेला फलक काढून सरकारने येथे संस्कृत भाषेतील नावाचा फलक लावला होता; परंतु फेब्रुवारी मासात रेल्वे प्रशासनाने त्याच्या अधिकारात तो काढून परत तिथे उर्दू भाषेतील अक्षरे असलेला फलक लावला. काँग्रेसच्या अनेक दशकांच्या राजकारणाचा हा परिपाक आहेच; पण रेल्वे आणि राज्य यांच्या प्रशासकीय मर्यादा आणि धोरणे याचेही सूत्र या निमित्ताने पुढे आले. रेल्वेस्थानक प्रबंधकाच्या या बेबंद कारभाराला जिल्हा प्रशासन आळा घालू शकले नाही.

‘इलाहाबाद’चे प्रयागराज, ‘फैजाबाद’चे अयोध्या, ‘अलीगढ’च हरिगढ, ‘शिमला’चे श्यामला, ‘मुगलसराय स्थानका’चे पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, ‘आगरा एअरपोर्ट’चे दीनदयाल उपाध्याय एअरपोर्ट असे अनेक पालट गेल्या ३-४ वर्षांत झाले आहेत. ‘अहमदाबाद’चे ‘कर्णावती’ करण्याचा प्रस्तावही आहे. महाराष्ट्रातील ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ होण्याच्या दिशेने मात्र पावले कधी उचलली जाणार ?’, हा प्रश्‍नही आहेच. आज टिपू सुलतानचे गोडवे गायले जाणे आणि छत्रपतींच्या किल्ल्यांची अद्यापही दुरवस्था असणे, हे कशाचे द्योतक आहे ? मुंबईत हाजीअली येथेही ‘मोगल गार्डन’ची निर्मिती होत असल्याचे सामाजिक प्रसारमाध्यमातून पुढे आले आहे.

स्वातंत्र्यानंतर येथील हिंदूंचा मूळ इतिहास मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी जाणीवपूर्वक दडपला गेला. साम्यवाद्यांच्या प्रभावाखालील समाजवादी काँग्रेसचे हे षड्यंत्र तळपायाची आग मस्तकात नेणारे होते. यामुळे हिंदूंचा पराक्रम, चालीरिती, संस्कृती, भाषा आदींचे खच्चीकरण झाले. येथील इतिहास परकियांच्या विचारांतून शिकवला गेल्याने तो मातीमोल झाला; एवढेच नव्हे तर ‘मोगल आणि इंग्रजी संस्कृती श्रेष्ठ’, असा बुद्धीभेदही गेल्या काही पिढ्यांत झाला. हिंदूंची कधीही भरून न निघणारी ही हानी आहे. त्यामुळे भारतभूवरील सार्‍या परकीय आक्रमणाच्या खुणा पुसून तेथे स्वकियांच्या गाथांचे गुणगान व्हावे, अशी देशप्रेमींच्या मनातील आकांक्षा आहे आणि येणारा काळही त्यासाठी अनुकूल आहे.