कोरोनाच्या काळात ओझोनच्या प्रमाणात १७ टक्के वृद्धी

श्‍वसनाशी संबंधित समस्या असणार्‍यांना कोरोनाच्या संसर्गाची शक्यता अल्प झाली !

ठाणे – कोरोनाच्या काळात वायूच्या घातक घटकांच्या उत्सर्जनाच्या पातळीमध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाली. त्यामुळे हवेचा दर्जा सुधारल्याने लोकांच्या श्‍वसनाचे आरोग्य सुधारले आहे. या काळात ओझोनच्या प्रमाणात १७ टक्के वृद्धी झाली आहे, अशी माहिती एल्सेव्हियर या संस्थेने अभ्यासाअंती प्रसिद्ध केली आहे.

या अहवालामध्ये म्हटले आहे की, दळणवळणबंदीच्या कालावधीत ‘पार्टिक्युलेट मॅटर’ २.५ (पीएम् २.५), पीएम् १०, ‘कार्बन मोनोक्साईड’ आणि ‘नायट्रोजन डायऑक्साईड ’यांच्या प्रमाणात अनुक्रमे ४३, ३१, १० आणि १८ टक्के अशी घट होत गेली, तर ओझोनच्या प्रमाणात १७ टक्के वाढ झाली. ‘सल्फर डायऑक्साईड’च्या प्रमाणात नगण्य घट झाली. प्रदूषणाच्या पातळीत होणारी ही घसरण श्‍वासोच्छवासाशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यास उपयुक्त ठरते, तसेच वायूप्रदूषणामुळे उद्भवणार्‍या मृत्यूंची जोखीमही अल्प करते.

या संदर्भात कोरोनाच्या साथीचा विचार केला, तर या काळात वायूप्रदूषण अल्प होऊन हवेचा दर्जा उत्तम झाल्याने अनेक व्यक्तींमध्ये श्‍वासोच्छ्वासाच्या समस्या न्यून झाल्याने परिणामी त्यांची कोरोनाच्या संसर्गाची शक्यता अल्प झाली.

अपोलो रुग्णालयातील फुप्फुस विकार विभागाच्या सल्लागार डॉ. जयलक्ष्मी टी.के.  म्हणाल्या, ‘‘ज्या ठिकाणी हवेची गुणवत्ता फारशी सुधारत नाही, अशा ठिकाणी व्यक्तींच्या आरोग्याची गुंतागुंत वाढते आणि त्यांना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. वाहतूक आणि उद्योग यांच्यामुळे मागील दोन दशकांत हृदय आणि रक्तवाहिन्या यांसंबंधीचे रोग, फुप्फुसाचे तीव्र आजार, जंतूसंसर्ग, दमा आणि अस्थमा यांचे प्रमाण वाढत चालले होते.’’