भाजप खासदाराकडून माजी सैनिकाला मारहाण; गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

उन्मेष पाटील आणि अनिल देशमुख

मुंबई – भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी चार वर्षांपूर्वी माजी सैनिकाला मारहाण केल्याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता चौकशीचे आदेश दिले आहेत. वर्ष २०१६ मध्ये भाजपचे तेव्हाचे आमदार आणि आताचे खासदार उन्मेष पाटील आणि इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांना मारहाण केली होती. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. या संदर्भात मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

वर्ष २०१६ मध्ये हा गुन्हा घडला होता; परंतु तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर गुन्हा नोंद झाला नाही. त्यानंतर वर्ष २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद करण्यात आला; परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई पाटील यांच्यावर झाली नाही, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

भाजपने मुंबईतील निवृत्त अधिकार्‍याला मारहाण झाल्याविषयी आंदोलन चालू केल्यानंतर आता काँग्रेसने हे प्रकरण पुढे आणले आहे.