महापालिका अधिकारी गुन्हेगारांसारखी वागणूक देत आहेत !

रुग्णालय प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी एकमेकांशी सामंजस्याने वागून रुग्णसेवेला प्राधान्य देणे सध्या अपेक्षित आहे !

खासगी रुग्णालय चालकांचे गार्‍हाणे

पुणे – कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र सरकारचे आदेश आणि बिलांच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना यांचे पालन करीत असतांनाही महापालिकेचे अधिकारी नाहक मानसिक त्रास देत आहेत. गुन्हेगारांसारखी वागणूक देत आहेत; परंतु अडचणीच्या काळात आम्हालाही समजून घ्या, अशी व्यथा पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालय चालकांच्या शिष्टमंडळाने १४ सप्टेंबर या दिवशी मांडली. कोरोनाबाधितांवर उपचार करीत असलेल्या खासगी रुग्णालय चालकांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोरील अडचणींविषयी माहिती दिली.

राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्या आवाहनानुसार, आमच्या रुग्णालयांना पूर्ण समर्पित कोविड रुग्णालयामध्ये रूपांतरित केले आहे. कोरोनाच्या कालावधीत वैद्यकीय कर्मचार्‍यांची मोठी कमतरता आहे. ‘ऑक्सिजन’चे शुल्क अधिक आहे. देयकांविषयी सरकारी सूचनांचे पालन केले जात आहे, तरी लेखा-परीक्षणासाठी १२-१२ घंटे बसवून ठेवले जाते. रुग्णालयांमधील कर्मचार्‍यांचे शारीरिक आणि मानसिक तणाव वाढले आहेत, अशा परिस्थितीत आमच्याकडून काय अपेक्षा आहे ?, असा प्रश्‍न शिष्टमंडळाने उपस्थित केला आहे. याविषयी ‘तुमच्या समस्या शासन दरबारी मांडल्या जातील’, असे आश्‍वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले आहे.