लाईफलाईन रुग्णालयाने भरलेली २५ लाख रुपयांची अनामत रक्कम जप्त

पुणे – रुग्णांवरील उपचारांतील दिरंगाईविषयी काम काढून घेतलेल्या जम्बो रुग्णालयाच्या जुन्या ‘एजन्सी’ने म्हणजेच लाईफलाईन रुग्णालयाने भरलेली २५ लाख रुपयांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त करण्यात आली आहे. त्यातून रुग्णांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, तसेच आणखी काही खाटा वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिक रुग्णांना उपचार मिळतील, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सांगितले.

जम्बो रुग्णालयाचे दायित्व असतांनाही लाईफलाईन रुग्णालयाने रुग्ण, उपचार, औषधे, तसेच जेवण आणि काम यांचा तपशील ठेवला नव्हता. त्यामुळे तो मिळवतांना महापालिका आणि नवी ‘एजन्सी’ यांना अडचणी आल्या. त्यामुळे लाईफलाईन रुग्णालयाच्या कामाविषयी आक्षेप घेण्यात येत आहेत.  रुग्णांच्या नातेवाइकांसाठी जम्बो रुग्णालयाच्या नव्या व्यवस्थापन समितीने १४ सप्टेंबर या दिवसापासून रुग्णांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती ‘ऑनलाईन’ देण्याची सुविधा उपलब्ध केली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन झाले.