गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा, यासाठी नव्याने चळवळ उभारण्याचा मराठीप्रेमींचा निर्णय

पणजी, १५ सप्टेंबर (वार्ता.) – जम्मू-काश्मीरमध्ये ५ राजभाषा आहेत, तर मग गोव्यात कोकणीसमवेत मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यास काय अडचण आहे ? असा प्रश्‍न मराठीप्रेमींनी उपस्थित केला आहे. मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने मराठीप्रेमींची नुकतीच एक ‘ऑनलाईन’ बैठक झाली. या बैठकीत ही मागणी करण्यात आली. मराठी राजभाषेसाठी नव्याने चळवळ उभारण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत मच्छिंद्र च्यारी, मोहन डिचोलकर, प्रकाश भगत, प्रदीप घाडी आमोणकर, अनिल पाटील, मंगेश कुंडईकर, निवृत्ती शिरोडकर, रामकृष्ण गावस, राजाराम पाटील, भरत बागकर, प्रितंका सावंत आदी मराठीप्रेमी उपस्थित होते.

बैठकीत मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी सरकार स्तरावर करावयाचे प्रयत्न, शालेय स्तरापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत निरनिराळे उपक्रम आणि स्पर्धा घेऊन मराठीविषयी जागरूकता निर्माण करणे, विद्यापिठात भाषाविषयक अध्ययनावर भर देणे, राज्यातील सर्व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेतूनही असावेत, यासाठी करावयाचे प्रयत्न आदी सूत्रांवर चर्चा करण्यात आली. मराठीच्या कार्यात सहभागी असलेली सरकारी आणि लोकसहभागातून उभी राहिलेली, अशा दोन्ही मराठी अकादमी यांनी एकत्रित काम करावे, असे मत या वेळी अनेकांनी व्यक्त केले. राज्यात कार्यरत असलेली विविध सांस्कृतिक मंडळे, संस्था, गट अशा सर्वांना एकत्रित घेऊन मराठीची चळवळ पुढे नेण्यावरही बैठकीत चर्चा झाली.