मेर्वी (तालुका रत्नागिरी) येथे बिबट्याच्या आक्रमणात ३ जण घायाळ

रत्नागिरी – तालुक्यातील मेर्वी बेहेरे टप्पा येथे १४ सप्टेंबरच्या रात्री बिबट्याने तिघांवर आक्रमण केले. एका घंट्याच्या कालावधीत तिघांवर आक्रमण झाल्याच्या घटनेमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील बेहेरे टप्पा येथे मेर्वी येथून अजय थुळ हे माळुंगे येथे जात असतांना त्यांच्यावर बिबट्याने आक्रमण करून त्यांना घायाळ केले, तसेच गावखडीकडे जाणारे दुचाकीस्वार पेजे यांच्यावर आणि मेर्वी येथील पायल खर्डे या पावसहून घरी जात असतांना त्यांच्या दुचाकीवर बिबट्याने आक्रमण केल्यामुळे त्याही घायाळ झाल्या आहेत. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

नागरिकांच्या संरक्षणासाठी वनविभाग आणि पोलीस यांची संयुक्त पथके नियुक्त करावीत ! –  अधिवक्ता दीपक पटवर्धन, जिल्ह्याध्यक्ष, भाजप

तालुक्यात बिबट्या नागरिकांना लक्ष्य करत असल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे बिबट्याचा बंदोबस्त तात्काळ करणे आवश्यक आहे. बिबट्या हा ‘संरक्षित प्राणी’ या प्रकारात येत असल्याने अनेक तांत्रिक गोष्टींच्या अंतर्भावामुळे त्याच्या कार्यवाहीसाठी वेळ लागू शकतो; मात्र होणारी दिरंगाई ही नागरिकांच्या जिवावर बेतणारी ठरते. यासाठी गावखडी रस्त्यावर वनविभाग आणि पोलीस यांची संयुक्त पथके अन् ‘पेट्रोलिंग व्हॅन’ सायंकाळी ६ ते पहाटे ७ पर्यंत नियुक्त करण्यात यावीत. या रस्त्यावर प्रखर दिव्यांची व्यवस्था तात्काळ करावी, तसेच नागरिकांना संरक्षण मिळावे, अशी मागणी भाजपचे जिल्ह्याध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली.