शीव (मुंबई) येथील रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदल, २ कर्मचारी निलंबित

या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून शासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी !

मुंबई – शीव येथील महानगपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने शवगृहातील २ कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. या प्रकरणात मृतदेहाची किडनी काढण्यात आल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी वडाळा येथे अपघातात घायाळ झालेला युवक अंकुश सुरवडे याचा १२ सप्टेंबरच्या रात्री रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचा मृतदेह घेण्यासाठी कुटुंबीय रुग्णालयात गेले असता त्यांना अन्य रुग्णाचा मृतदेह देण्यात आला, तर अंकुश याचा मृतदेह अन्य मृतांच्या नातेवाइकांना देऊन त्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. यामध्ये न्यायवैद्यकशास्त्र विभागात मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे प्रथम चौकशीत आढळून आले आहे. रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू असल्याचे सांगितले.