केंद्रशासन पुरस्कृत ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’चा लाभ घेण्याचे आवाहन

खेड – शहरातील पथ विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायासाठी नगर परिषदेच्या वतीने खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गरजू पथविक्रेत्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन येथील नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दळणवळण बंदीमुळे पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा चालू करण्यासाठी खेळते भांडवल तातडीने प्रदान करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार केंद्रशासन पुरस्कृत ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’च्या अंतर्गत विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेच्या माध्यमातून शहरातील पथविक्रेत्यांना साहाय्य म्हणून खेळते भांडवल रुपये १० सहस्र कर्ज स्वरूपात बँकेकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी पथविक्रेत्यांनी शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरी सुविधा केंद्र, सेतू सुविधा केंद्र यांच्याद्वारे अर्ज करू शकतात, तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.