रिया आणि शोविक यांना अमली पदार्थ पुरवणार्‍या आणखी एका दलालाला अटक

सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या अन्वेषणाचे प्रकरण

मुंबई – रिया आणि शोविक चक्रवर्ती यांना अमली पदार्थ पुरवणार्‍या आणखी एका दलालाला अमली पदार्थविरोधी पथकाने १४ सप्टेंबर या दिवशी वरळी येथून अटक केली असल्याची माहिती सहसंचालक समीर वानखेडे यांनी दिली. रिया-शोविक आणि सॅम्युएल मिरांडा यांना अमली पदार्थ पुरवणार्‍या अन्य ७ दलालांना अमली पदार्थविरोधी पथकाने यापूर्वी मुंबई आणि गोवा येथून अटक केली आहे.

समीर वानखेडे यांनी मुंबईतील अमली पदार्थाच्या विरोधात महत्त्वाच्या कारवाया केल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील अमली पदार्थविरोधी पथकाने मागील २ वर्षांत १७ सहस्र कोटी रुपयांच्या अमली पदार्थांवर कारवाई केली आहे. यापूर्वीही अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, रामगोपाल वर्मा यांसह चित्रपटसृष्टीतील अन्यही अभिनेत्रींच्या घरावर त्यांनी धाड टाकली आहे. वर्ष २०१३ मध्ये गायक मिका सिंह यांना त्यांनी मुंबई विमानतळावर विदेशी चलनासह पकडले होते. सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणातील अमली पदार्थांचे चित्रपटसृष्टीतील धागेदोरे शोधण्याचे दायित्व समीर वानखेडे यांच्यावर देण्यात आले आहे. समीर वानखेडे यांच्या धडक कारवाया पहाता या प्रकरणातीलही चित्रपटसृष्टीतील संबंधांचा ते शोध घेतील, असा विश्‍वास जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.