हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गाचे १५० भाग पूर्ण !

प्रतिदिन सरासरी ८ सहस्र विद्यार्थ्यांचा प्रतिसाद !

मुंबई – कोरोनाच्या संसर्गामुळे दळणवळणबंदी घोषित करण्यात आली. त्यामुळे शाळा बंद झाल्या. बाहेरही पडता येत नसल्याने अनेक मुले घरी बसून कंटाळली होती. याच कालावधीत म्हणजे १ एप्रिल २०२० या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पहिला ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग घेण्यात आला. पहाता पहाता या वर्गांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गांचा १५० वा भाग नुकताच सादर करण्यात आला. सध्या या ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गाला प्रतिदिन उपस्थित रहाणार्‍या मुलांची संख्या सरासरी ८ सहस्र इतकी आहे. या बालसंस्कारवर्गात राष्ट्र, धर्म, देवता, साधना, भक्ती, तसेच क्रांतीकारक या विषयांच्या अनुषंगाने मुलांना माहिती देण्यात आली, तसेच विविध गोष्टीही सांगण्यात आल्या.

बालसंस्कारवर्गात सांगितल्यानुसार अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसण्यापूर्वी नामजप करणे, आई-वडिलांचे ऐकणे, या कृतींना आरंभ केला. तसेच अनेक मुले दैनंदिनी लिहीत असून अभ्यासही करत आहेत. ‘अभ्यास आणि खेळ यांच्या वेळेचे नियोजन करणे चालू केले’, असे विद्यार्थ्यांनी अभिप्राय देऊन कळवले. ‘बालसंस्कारवर्ग चालू झाल्यापासून मुलांच्या वागण्यात चांगला पालट जाणवत आहे’, असे काही पालकांनी कळवलेे.

वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

१. कु. याज्ञी सणस, गोवा – बालसंस्कारवर्ग पाहू लागल्यापासून मी घरी नियमित वास्तूशुद्धी करते आणि सायंकाळी दिवा लावते. आधी मी कार्टून पहायचे; पण आता ते न पहाता मी ‘महाभारत’ आणि ‘रामायण’ पहाते.

२. कु. प्रणव तागडे, पुणे – बालसंस्कारवर्गात क्षमा मागण्याचे महत्त्व सांगितले होते. जेव्हा माझ्याकडून चूक होते, तेव्हा मी आई-वडील आणि श्रीकृष्ण यांची क्षमा मागतो. माझ्यातील चिडचिडेपणा हा दोष जाण्यासाठी देवाला प्रार्थनाही करतो.

३. कु. अनंत गुप्ता, नाशिक – आधी मी गृहपाठ करायचो नाही. आता नामजप करू लागल्यापासून माझा गृहपाठ अल्प वेळेत पूर्ण होतो.

पुढील लिंकच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गाचा लाभ घ्या !