६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाळासाहेब विभूते यांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या विषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे देवद आश्रमात आगमन झाल्याच्या दिवशी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाळासाहेब विभूते यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. अप्पाची वाडी येथील श्री हालसिद्धनाथ यांचा अंगात संचार झाल्यावर भाकणूक करणारे पू. भगवान डोणे महाराज यांची अकस्मात् आठवण होऊन उत्साह जाणवू लागणे

‘एकदा पहाटेपासूनच मला पुष्कळ उत्साह जाणवत होता. स्नान झाल्यानंतर एकाएकी मला श्री हालसिद्धनाथांची तीव्रतेने आठवण आली. पू. भगवान डोणे महाराज (वाघापुरे महाराज) भाकणूक करण्यापूर्वी त्यांच्यात श्री हालसिद्धनाथांचा संचार होतो. त्यांच्यात संचार होत असतांना ते एका विशिष्ट लयीमध्ये नृत्य करतात. अकस्मात् मी तसे नृत्य करायला लागलो. त्यातून मला पुष्कळ आनंद मिळाला. प.पू. भक्तराज महाराज रचित भजने ऐकून जसा आनंद होतो, तसा आनंद मला जाणवत होता. मी वाहनांची शुद्धी करण्याच्या सेवेसाठी निघालो. त्यापूर्वी मी शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाचे दर्शन घेतले. मला शिवमंदिरातही पुष्कळ चैतन्य जाणवत होते.

श्री. बाळासाहेब विभूते

२. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे देवद आश्रमात आगमन झाल्याप्रीत्यर्थ त्यांचे स्वागत करण्याविषयीचा फलक न वाचताही फलक नुसता पाहूनच भावजागृती होणे

मी आश्रमात आल्यावर मला एक फलक लावलेला दिसला. त्यावर ‘काय लिहिले आहे ?’, हे मला ठाऊक नव्हते, तरी तो फलक पाहून माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू यायला लागले. तो फलक वाचण्यासाठी मी त्या फलकाच्या जवळ गेलो. त्यावर लिहिले होते, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे देवद आश्रमात आगमन झाले आहे. साधकांचा उद्धार करण्यासाठी गुरुकृपेचा मळवट भरून भवानीदेवी आली.’ हे वाचताच मला मळवट भरलेली, रुद्रावतार धारण केलेली दुर्गामाता स्पष्टपणे दिसली आणि माझ्या अंगावर रोमांच आले. (वर्ष १९८१ मध्ये मला माझ्या घरी कुरळी येथे स्वप्नात प्रत्यक्ष दुर्गादेवी वाघावर बसलेली दिसली होती.)

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ खोलीत येणे

३ अ. पत्नीने देवाला कळकळीने केलेली प्रार्थना प्रत्यक्षात फलद्रूप होऊन श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भेटायला येणे : मी खोलीत गेल्यावर ही वार्ता माझ्या पत्नीला सांगितली. तेव्हा ती आनंदाने उड्या मारू लागली. तिचे हर्नियाचे शस्त्रकर्म होणार होते. त्यामुळे ती ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटायचे आहे’, अशी कळकळीने प्रार्थना करत होती. तिच्या त्या तळमळीमुळे सायंकाळी ७ वाजता श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आमच्या खोलीत आल्या.

३ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ खोलीत आल्यावर ‘साक्षात् दुर्गादेवी अवतरली आहे’, असे जाणवणे : त्यांना पाहून ‘साक्षात् दुर्गादेवीच अवतरली आहे’, असे मला जाणवले. त्यांच्या समवेत पू. (सौ.) अश्‍विनी पवार आणि अन्य साधक होते. माझा माझ्या डोळ्यांवर विश्‍वासच बसत नव्हता. माझे मन आनंदाने थुई थुई नाचू लागले. मला ‘काय करू ? आणि काय नको ?’, असे होत होते. मला काही सुचण्याआधीच त्या आसंदीत येऊन बसल्या. मला त्या वेळी ‘काळ थांबला आहे’, असे जाणवले. ‘हे सगळे सत्य आहे’, याची निश्‍चिती करून घेण्यासाठी मी स्वतःला चिमटा काढून पाहिला. त्यांनी ‘कसे आहात ?’, हे आत्मियतेने विचारलेले शब्द अजूनही माझ्या कानात घुमत आहे.

३ इ. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना खोलीत हालसिद्धनाथांचे अस्तित्व जाणवणे आणि स्वतःला सकाळी श्री हालसिद्धनाथांचे अस्तित्व जाणवणे, हे सत्य असल्याची निश्‍चिती होणे अन् तेव्हा पत्नीला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये दुर्गादेवी दिसणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सकाळची अनुभूती सांगत असतांना मनात तीव्रतेने एक विचार आला, ‘त्यांना श्री हालसिद्धनाथांचा भंडारा देऊया’; मात्र, ‘हे कसे विचारायचे ?’, असे वाटत होते. तेवढ्यात त्यांनी डोळे बंद केले आणि त्या म्हणाल्या, ‘‘मला येथे श्री हालसिद्धनाथांचे अस्तित्व जाणवत आहे. या वास्तूत पुष्कळ छान वाटत आहे.’’ त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘सकाळी श्री हालसिद्धनाथांची आठवण येऊन मी का नाचत होतो ?’ ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून श्री हालसिद्धनाथ आले आहेत’, याची मला निश्‍चिती पटली. मी पत्नीला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना श्री हालसिद्धनाथांचा भंडारा देण्यास सांगितले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आनंदाने आणि कृतज्ञतापूर्वक भंडारा स्वीकारला. त्या वेळी माझ्या पत्नीला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये दुर्गादेवी दिसली. त्यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले.

३ ई. पत्नीला ‘हर्नियाचे शस्त्रकर्म व्यवस्थित होणार’, असे आश्‍वस्त करणे : त्यांनी माझ्या पत्नीला ‘हर्नियाचे शस्त्रकर्म व्यवस्थित होणार’, असे आश्‍वस्त केले. या शस्त्रकर्माला ४ – ५ घंटे लागले. हे शस्त्रकर्म व्यवस्थित पार पडले. ‘पत्नीला शक्ती देण्यासाठीच त्या एवढ्या व्यस्ततेमधून आल्या’, त्याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘देव आमच्यासारख्या सामान्य जिवावर का भाळतो ?’ असा प्रश्‍न मला पडला.

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, यांचे दर्शन होणे आणि लक्षात येणे  की, ते दोघे आणि श्री हालसिद्धनाथ एकच आहेत

साडेचार वर्षांपूर्वी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी मला त्यांच्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले होते. मला काहीच बोलता आले नाही. माझ्या डोळ्यांतून केवळ अश्रूधारा वहात होत्या. या सर्व गोष्टींचे आकलन झाल्यावर माझ्या लक्षात आले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्री हालसिद्धनाथ एकच आहेत.’

५. प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्री हालसिद्धनाथ हे एकच आहेत’, याची प्रचीती येणे

१५.९.२०१९ या दिवशी नेहमीप्रमाणे वाहनशुद्धीची सेवा करण्यास प्रारंभ केला. सेवा करतांना, मी ‘मला ही वाहनशुद्धी करण्याची संधी दिली. त्यासाठी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी सेवा माझ्याकडून करवून घ्या. प्रथमतः माझ्याभोवती तुमच्या चैतन्याचे संरक्षक कवच निर्माण करा. आश्रमातील सर्व वाहने आणि त्यातून प्रवास करणार्‍या सर्व साधकांभोवती तुमच्या चैतन्याचे संरक्षक कवच निर्माण होऊ द्या. वाहनांची दुरुस्ती वाजवी खर्चात होऊन पूर्ण क्षमतेने गुरुसेवा होऊ दे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना’, अशी कृतज्ञता आणि प्रार्थना श्री हालसिद्धनाथांना केली. श्री हालसिद्धनाथांच्या मंदिरात आरतीच्या वेळी धूप आणि दीप याने ओवाळतात. प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीची शुद्धी करत असतांना मला तेच दृश्य अनुभवायला आले. प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीत त्यांचे एक तैलचित्र आहे. त्यात मला एका क्षणी श्री हालसिद्धनाथ आणि एका क्षणी प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन होत होते. हे दृश्य मला बराच वेळ दिसले. त्यातून मला पुष्कळ आनंद मिळाला. ‘प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्री हालसिद्धनाथ हे एकच आहेत’, याची मला प्रचीती आली.’

– श्री. बाळासाहेब विभूते, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.९.२०१९)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक