शासनाकडून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत आजपासून घरोघरी जाऊन रक्तातील प्राणवायू आणि शरिराचे तापमान यांची तपासणी

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग चालू

रत्नागिरी – जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत सध्या कोरोनाबाधितांचा दर १८ टक्के आहे. जिल्हा कोरोनामुक्त करण्याच्या दृष्टीने आजपासून शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत घरोघर जाऊन तपासणी केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्याचा हा दर ४० टक्क्यांच्या आसपास वाढण्याची शक्यता आहे. साधारणपणे सप्टेंबर मासाच्या शेवटी ३ सहस्र ८००, तर ऑक्टोबर मासाच्या शेवटी ९ सहस्र रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेणारे (सक्रीय) रुग्ण वाढलेले दिसतील. साधारण एक मास चालणार्‍या या विशेष मोहिमेसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागासह जिल्हा शासकीय रुग्णालय मिळून ५६४ पथके सिद्ध करण्यात आली आहेत. विविध प्रकारे उपाययोजना करूनही राज्यातील कोरोनाबाधितांची वाढ आटोक्यात येऊ शकलेली नाही, त्यामुळे ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येकाची आरोग्य तपासणी, अतीतीव्र स्वरूपाचे आजार असल्यास उपचार आणि आरोग्य शिक्षण या सूत्रांनुसार काम केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ‘ऑनलाईन’ पत्रकार परिषदेत दिली.

‘तपासणीमुळे रुग्ण वाढणार असले, तरी आरोग्ययंत्रणा त्यासाठी सज्ज आहे. सर्वांनी स्वत:ची तपासणी करून घ्यावी आणि घरी येणार्‍या पथकाला सहकार्य करावे’, असे आवाहनही मिश्रा यांनी या वेळी केले.

जिल्ह्यात समूह संसर्ग चालू! – जिल्हाधिकारी

यासंदर्भातील अधिक माहिती देतांना जिल्हाधिकारी मिश्रा यांनी ‘रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग चालू झाला आहे’, असे सांगितले.