सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २ सहस्र ५२० रुग्णांपैकी १ सहस्र ४९१ रुग्ण कोरोनामुक्त

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत नवीन ५१ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या २ सहस्र ५२० झाली आहे. त्यांपैकी आतापर्यंत १ सहस्र ४९१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ९८३ रुग्णांवर उपचार चालू आहेत. १ कोरोनाबाधित रुग्णांचे निधन झाल्याने जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४६ झाली आहे.

दोडामार्ग तालुक्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू

दोडामार्ग – तालुक्यात १५ सप्टेंबरला कोरोनामुळे पहिला बळी गेला. ही व्यक्ती दोडामार्ग सुरुची येथील असून बँक कर्मचारी होती. १० दिवसांपूर्वी त्यांचा कोरोनाशी संबंधित अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला होता. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांना कोरोनाव्यतिरिक्त मधुमेहाचा आजर होता. या घटनेने नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयाबाहेर कोरोनाबाधित रुग्णांसाठी साहाय्यता केंद्र चालू करणार ! – मनसे

कणकवली – जिल्हा रुग्णालयात येणारे कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी मनसेच्या वतीने जिल्हा रुग्णालयाबाहेर साहाय्यता केंद्र चालू केले जाणार आहे. मनसेकडून जिल्हा रुग्णालयातील गैरसोयींविषयी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर रुग्णांचे जेवण आणि इतर सुविधा यांमध्ये सुधारणा झाली आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा ‘जनता संचारबंदी’ लागू करा ! – शिवसेनेची मागणी

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा एकदा १४ दिवसांचा ‘जनता संचारबंदी’ (जनता कर्फ्यू) लागू करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. १७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत काही सण, उत्सव नसल्यामुळे जनता संचारबंदीचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मालवण सुवर्णकार संघ १६ ते २३ सप्टेंबर या कालावधीत सराफी दुकाने बंद ठेवणार

मालवण शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मालवण सुवर्णकार संघाच्या वतीने १६ ते २३ सप्टेंबर या कालावधीत सराफी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात केलेल्या तपासणीत १५ सप्टेंबरला ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये शहरातील एका पोलीस कर्मचार्‍यासह खासगी डॉक्टरांच्या कुटुंबातील दोघांचा समावेश आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर शासकीय खर्चाने अंत्यसंस्कार होणार

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन जिल्हा रुग्णालयातील कोरोनाशी संबंधित उपचारांविषयीच्या व्यवस्थेची माहिती घेतली. या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी कोरोनाबाधित रुग्णांना व्यवस्थित जेवण देणे, प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि दुरुस्ती करणे, रुग्णालयातील स्वच्छता करणे आदींविषयी तात्काळ संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर शासकीय खर्चाने ओरोस प्राधिकरण येथेच अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले.