कोरोनाची लक्षणे आढळल्यास चाचणी आणि उपचार न करता घरी राहू नका ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

कोरोनाचा संसर्ग झालेले योग्य वेळी उपचार घेत नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १५ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोनाची लक्षणे आढळल्यास चाचणी आणि उपचार न करता कुणीही घरी राहू नये. कोरोनाची लक्षणे आढळल्यास प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. चाचणीसाठी आरोग्यकेंद्रात आलेल्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत केले. राज्यातील कोरोना व्यवस्थापनाशी संबंधित अधिकार्‍यांसमवेत झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘कोरोना चाचणीसाठी कुणीही आल्यास शक्यतो त्याची चाचणी त्याच वेळी केली पाहिजे. घरी अलगीकरणात असलेले आणि कोरोना निगा केंद्रात असलेले रुग्ण यांच्याशी आरोग्य अधिकार्‍यांनी संपर्कात रहाणे आवश्यक आहे. घरी अलगीकरणात राहू इच्छिणार्‍या रुग्णांच्या घरात कुणी ज्येष्ठ (वयस्कर) माणूस आणि शौचालय आहे का, याची माहिती घ्यावी. घरात ज्येष्ठ व्यक्ती असल्यास त्या रुग्णाला कोरोना निगा केंद्रात पाठवणे योग्य ठरेल. कोरोनाचा संसर्ग झालेले योग्य वेळी उपचार घेत नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्य होण्याचे प्रमाण वाढले आहे. वास्तविक गोव्यात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णांवर चांगले उपचार केले जातात; मात्र तरीही कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. कोरोना महामारीशी संबंधित अडचणी सातत्याने सोडवणे, समुपदेशन करणे, योग्य शिक्षण आणि सल्ला देणे अत्यावश्यक आहे.

गोव्यात प्राणवायूचा (ऑक्सीजन) तुटवडा नाही

गोव्यात प्राणवायूचा (ऑक्सीजन) तुटवडा नाही. राज्यात एकाही रुग्णालयात प्राणवायूच्या कमतरतेमुळे रुग्णाचे निधन झालेले नाही. गोव्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक येथून प्राणवायूचा पुरवठा होत आहे आणि हा पुरवठा सुरळीत होण्यासाठी आरोग्य खात्याचे अधिकारी संबंधितांच्या सातत्याने संपर्कात आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांना एक दिवस भूमीवर (रुग्णालयाच्या फरशीवर) झोपावे लागले. याविषयी मी खेद व्यक्त करतो. या रुग्णांना नंतर अन्यत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली किंवा त्यांना खाटा पुरवण्यात आल्या.

‘प्लाझ्मा’ दान करण्याची सिद्धता

कोरोनापासून मुक्त झाल्यानंतर रक्ताशी संबंधित चाचण्यांचे निकष मापदंडात बसत असतील, तर माझी ‘प्लाझ्मा’ दान करण्याची सिद्धता आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे २ सप्टेंबर या दिवशी कोरोनाबाधित झाले आहेत आणि ते सध्या घरी अलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.’’