आगर्‍यातील संग्रहालयाला मोगलांचे नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देणार ! – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा

  • मोगल संग्रहालयाचे नाव पालटून त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन ! आता केंद्र सरकारने देशभरतील इस्लामी आक्रमकांच्या स्मृती पुसून टाकून त्याजागी हिंदूंच्या तेजस्वी राजांच्या स्मृतींद्वारे जनतेमध्ये शौर्यजागरण करावे, ही अपेक्षा !
  • स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांपासून दास्यत्वाचे प्रतीक असलेल्या आक्रमकांच्या स्मृती पुसण्याऐवजी त्या जपण्याची पराभूत मानसिकता केवळ भारतात दिसून येते ! हे चित्र केंद्र सरकारने पालटून त्याजागी मनामनांत हिंदूंच्या तेजस्वी राजांच्या स्मृती रुजवल्या पाहिजे, असेच जनतेला वाटते !

लक्ष्मणपुरी – आगर्‍यात उभारण्यात येणार्‍या संग्रहालयाला ‘मोगल म्युझियम’  नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. याविषयी त्यांनी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव जीतेंद्र कुमार यांना कार्यवाही करण्याचा आदेशही दिला. या संग्रहालयाचे बांधकाम चालू आहे. हे संग्रहालय ताजमहालच्या पूर्व प्रवेशद्वाराजवळ बांधण्यात येत असून त्यासाठी १५० कोटी रुपयांचा व्यय (खर्च) अपेक्षित आहे. उत्तरप्रदेशमधील तत्कालीन समाजवादी पक्षाच्या राजवटीत या मोगल संग्रहालयाचे बांधकाम चालू करण्यात आले होते. (तत्कालीन समाजवादी पक्षाची गुलामी मानसिकता ! असे सरकार उत्तरप्रदेशात सत्तेवर होते, हे हिंदूंचे दुर्दैव होय ! – संपादक)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘उत्तरप्रदेश सरकार राष्ट्रवादी विचारांना प्रोत्साहन देणारे आहे. त्यामुळे गुलामगिरीच्या मानसिकतेच्या प्रतीकांऐवजी राष्ट्राप्रती गौरव वाढवणार्‍या गोष्टींना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. मोगल आपले नायक असू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हेच आपले खरे नायक आहेत.’’

मराठा साम्राज्याच्या कालखंडातील वस्तूंचे प्रदर्शनही लावणार !

पर्यटन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या संग्रहालयात मोगलकालीन वस्तू आणि दस्ताऐवज यांचे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह संपूर्ण मराठा साम्राज्याच्या कालखंडातील अनेक वस्तूंचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मनापासून अभिनंदन ! – भाजपचे खासदार उदयनराजे भोसले

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्वीट करत या निर्णयाविषयी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. उदयनराजे भोसले यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला तो आगर्‍यातील औरंगजेबाच्या दरबारातून. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आगरा नगरित ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय हा संपूर्ण देशाला अभिमानास्पद आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मनापासून अभिनंदन.’