काही देशांकडून कारोना महामारीचा आतंकवादासाठी अपलाभ उठवण्याचा प्रयत्न !  

पाक आणि चीन यांचे नाव न घेता संयुक्त राष्ट्रांत भारताची टीका

अशा टीकांचा या दोन्ही निर्ढावलेल्या देशांवर काहीही परिणाम होणार नाही, त्यांना शस्त्रांचीच भाषा समजते !

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस्. तिरुमूर्ती

न्यूयॉर्क (अमेरिका) – कोरोना महामारीच्या काळाचाही काही देश आतंकवादाला समर्थन आणि आपल्या आक्रमक धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी वापर करत आहेत, अशी टीका भारताने पाक आणि चीन यांचे नाव न घेता ‘भारत-यु.एन्. डेव्हलपमेंट पार्टनरशिप फंड’च्या तिसर्‍या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केली. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस्. तिरुमूर्ती यांनी ही टीका केली. ‘दुसरीकडे कोरोनाच्या काळात इतर देशांच्या साहाय्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता. या महामारीच्या काळात त्वरित वैद्यकीय साहाय्याची आवश्यकता आहे’, असेही ते म्हणाले.

चीनला पराभूत करून भारत ‘सी.एस्.डब्ल्यू’च्या सदस्यपदाच्या निवडणुकीत विजयी

भारताची ‘सी.एस्.डब्ल्यू’च्या (‘कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमन’च्या) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. भारत, अफगाणिस्तान आणि चीन या ३ देशांनी ‘सी.एस्.डब्ल्यू’साठी निवडणूक लढवली होती. यामध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांनी ५४ सदस्यांच्या मतांद्वारे विजय मिळवला, तर चीनला पराभव पत्करावा लागला. या विजयानंतर भारत पुढील ४ वर्षांसाठी या आयोगाचा सदस्य असेल.