पोलिसांच्या त्रासाला कंटाळून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूर – बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती घालून करवीर पोलीस ठाण्यातील काही पोलिसांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप करत करवीर तालुक्यातील सुनील शांताराम बागम या तरुणाने १२ सप्टेंबरला दुपारी रंकाळ्यात उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने पोलीस आणि अग्नीशमन दलाची चांगलीच तारांबळ उडाली. अग्नीशमन दलाने सतर्कता दाखवत त्या तरुणाला वेळीच पाण्याबाहेर काढले. त्याच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जुना राजवाडा पोलिसांत नोंद करण्यात आला आहे.

२ दिवसांपूर्वी बागम यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासह वरिष्ठांकडे तक्रार अर्ज दिला होता. यामध्ये करवीर पोलीस ठाण्यातील कर्मचारी बर्गे यांच्यासह चौघांवर आरोप केले होते. कोरोनामुळे दळणवळण बंदीच्या काळात मार्च मासात बलात्कारासारखा गंभीर गुन्हा नोंद करण्याची भीती दाखवून ५० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी करत पोलीस ठाण्यात डांबून मारहाण केली गेली, असे आरोप त्यांच्या अर्जात केले आहेत. ‘या प्रकरणाचा सखोल तपास करा; अन्यथा १२ सप्टेंबर या दिवशी रंकाळ्यात उडी घेऊन जलसमाधी घेणार’, असे त्यांनी म्हटले होते. बागम यांच्या अर्जात करवीर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदार तसेच तेथील कर्मचारी यांच्या नावांचा उल्लेख त्यांनी केला आहे. (सर्वसामान्यांना आधार न वाटता जाच वाटणारे पोलीस कायदा-सुव्यवस्था काय राखणार ! तसेच संबंधित तरुणाने तलावात उडी मारणार असे सांगूनही पोलिसांनी काही पावले का उचलली नाहीत ? – संपादक) पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश करवीर पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर यांना दिले आहेत.