श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन

हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक पितृऋण फेडण्यासाठी ‘श्राद्ध’ आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ याउलट श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे वासनायुक्त पितर अनिष्ट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन ते पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते. अन्य संस्कारांइतकाच ‘श्राद्ध’ हा संस्कारही अत्यावश्यक आहे. २ ते १७ सप्टेंबर २०२० या कालावधीत पितृपक्ष आहे. त्यानिमित्ताने श्राद्धविषयक लिखाण येथे देत आहोत.

१९. श्राद्धविधीत वडील, आजोबा अन् पणजोबा अशा तीनच पिढ्यांचा उल्लेख केला जाणे आणि त्या आधीच्या पिढ्यांना श्राद्धात पिंडदान नसणे

धर्मशास्त्रात तीन पिढ्यांपर्यंत पिंडदान करण्यास सांगितले आहे. त्यांच्या आधीच्या पितरांची गणना दिव्य पितरांमध्ये केलेली आहे, म्हणजेच त्यांना मुक्तरूप मानले आहे. तसेच आपल्या आधीच्या तीन पिढ्यांतील पूर्वजांच्याच आपल्याकडून जास्त अपेक्षा असतात आणि त्या आधीच्या पिढ्यांतील पूर्वजांच्या तेवढ्या अपेक्षा नसतात.

श्राद्धात मुख्य पिंड आधीच्या तीन पिढ्यांसाठीच असले, तरी त्या आधीच्या पिढ्यांतील कुणास गती मिळाली नसल्यास त्यांच्यासाठी श्राद्धात धर्मपिंड दिले जातात. अशा प्रकारे श्राद्ध हा हिंदु धर्मात सांगितलेला एक परिपूर्ण विधी आहे.

२०. सर्वसाधारणतः श्राद्धकर्म कसे असते ?

१. अपसव्य करणे : देशकालाचा उच्चार करून अपसव्य करावे, म्हणजे जानवे डाव्या खांद्याऐवजी उजव्या खांद्यावर घ्यावे.

२. श्राद्धसंकल्प करणे : श्राद्धाला योग्य जे पितर त्यांची षष्ठी विभक्ती योजून ‘अमुकश्राद्धं सदैवं सपिण्डं पार्वणविधीना एकोद्दिष्टेन वा अन्नेन वा आमेन वा हिरण्येन सद्यः करिष्ये’, असा संकल्प श्राद्धकर्त्याने करावा.

३. यवोदक आणि तिलोदक तयार करावेत.

४. प्रायश्‍चित्तासाठी पुरुषसूक्त, वैश्‍वदेवसूक्त इत्यादी सूक्ते म्हणावीत.

५. ब्राह्मणांना प्रदक्षिणा घालाव्यात आणि नमस्कार करावा. त्यानंतर श्राद्धकर्त्याने ब्राह्मणांना प्रार्थना करावी, ‘आपण सर्वांनी हे कर्म सावधान, शांतचित्त, दक्ष आणि ब्रह्मचारी राहून करूया.’

६. २१ क्षण देणे : श्राद्धाच्या वेळी देव आणि पितर यांना एक एक दर्भ अर्पण करून निमंत्रित करावे.

७. देवस्थानी पूर्वाभिमुख आणि पितृस्थानी उत्तराभिमुख ब्राह्मण बसवावे. ब्राह्मणांना आसनासाठी दर्भ द्यावेत. देवांना दर्भ सरळ द्यावेत, तर पितरांचे दर्भ अग्राशी मुडपून द्यावेत.

(क्रमशः)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र’)