‘फेसबूक’चा हिंदुद्वेषी चेहरा !

‘फेसबूक’ने काही दिवसांपूर्वी सनातन संस्थेचे ‘फेसबूक पेज’ बंद केले, तसेच सनातन संस्थेच्या काही साधकांची ‘फेसबूक पेज’ही अचानक बंद करण्यात आल्याचे निदर्शनास आले. ८ वर्षांपूर्वी हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत ‘फेसबूक पेज’वरही अन्याय्य बंदी घालण्यात आली होती. आज जिहादी संघटनांची विखारी आणि आक्षेपार्ह  ‘फेसबूक पेज’ उघडपणे चालू आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही; मात्र भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून वैध मार्गाने हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍या सनातन संस्थेचे ‘फेसबूक पेज’ बंद केले जाते. हा ‘फेसबूक’चा हिंदु धर्माविषयीचा आकस आहे. भारतीय राज्यघटनेचे नागरिकांना भाषणस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. मनमानी कारभार करून राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्यांचा संकोच करणार्‍या ‘फेसबूक’वर भारत सरकारने कारवाई करायला हवी.

‘फेसबूक’ला हिंदु धर्मप्रसाराचे वावडे ?

श्री. चेतन राजहंस

सनातन संस्था ही धर्मप्रसार करणारी भारतातील एक अग्रणी संस्था आहे. सनातन संस्थेच्या वतीने सनातन धर्माचा वैज्ञानिक परिभाषेत प्रचार केला जातो. सनातन संस्था वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून सनातन आचारसंस्कृती, वेशभूषा, केशभूषा, आहार, संगीत, साधना आदी विषयांवर संशोधनकार्यही करत आहे. सनातन संस्थेच्या ‘फेसबूक’वरही अशा प्रकारच्या माहितीचा समावेश होता. या माध्यमातून सनातन धर्माची महती संपूर्ण जगात पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. यातील शब्द अन् शब्द संवैधानिक, संसदीय आणि सुसंस्कृत भाषेतील होता. जात-पंथ-धर्म यांवर कोणतीही आक्षेपार्ह टिपणी नव्हती. तरीही ‘फेसबूक’ने सनातन संस्थेच्या ४ ‘फेसबूक पेजेस’वर बंदी घातली. यातून ‘फेसबूक’ला सनातन धर्मप्रचाराचे वावडे आहे, हेच दिसून येते. ‘फेसबूक’ची कृती निषेधार्ह आहे.

‘फेसबूक’चा दुटप्पीपणा

४ सप्टेंबर २०२० ला सनातन संस्थेच्या ‘फेसबूक पेज’ला ‘ब्लॉक’ करतांना त्या ‘पेज’चे ‘अ‍ॅडमिन’ असणार्‍या साधकांना ‘फेसबूक’कडून संगणकीय पत्र पाठवण्यात आले. त्यामध्ये म्हटले होते की, ‘फेसबूक’ने त्या पानांवर कायमस्वरूपी बंदी घातली आहे. आम्ही इतरांना दुखापत करण्याच्या धमक्या देण्यास, हिंसक संघटनांचे समर्थन करण्यास किंवा अतीग्राफिक (चित्रे) सामुग्री यांना अनुमती देत नाही’. सनातन संस्थेचा प्रवक्ता या नात्याने मी ‘फेसबूक’ला आव्हान देतो की, मी ‘फेसबूक’च्या अन्य ‘पेजेस’वरील सहस्रो आक्षेपार्ह ‘पोस्ट’ दाखवण्यासाठी सिद्ध आहे. त्यांनी ‘सनातन’च्या ‘फेसबूक पेज’वरील एक आक्षेपार्ह ‘पोस्ट’ दाखवून द्यावी. ‘फेसबूक’वर जमात-उद-दावा, झाकीर नाईक, लष्कर-ए-तोयबा यांसारख्या आतंकवादी संघटनांची ‘पेजेस’ आहेत. या माध्यमातून उघडपणे आतंकवाद पसरवला जातो; समाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य केले जाते. ‘फेसबूक’चे मार्क झुकेरबर्ग त्यांना नोटीस पाठवण्याचे धाडस करत नाहीत; पण वैध मार्गाने कार्यरत असणार्‍या हिंदु धार्मिक संघटनेला ‘हिंसक संघटना’ असे संबोधते !

८ वर्षांपूर्वी हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत ‘फेसबूक पेज’वरही अशाच प्रकारे अन्याय्य बंदी घालण्यात आली होती. हिंदुत्वनिष्ठ वृत्तवाहिनी ‘सुदर्शन न्यूज’चे ‘पेज’ही बंद करण्यात आले होते. नुकतेच भाग्यनगरचे भाजपचे आमदार टी. राजासिंह यांचे खाते ‘फेसबूक’कडून बंद करण्यात आले. हा ‘फेसबूक’चा हिंदुविरोधी चेहरा आहे.

‘फेसबूक’कडून भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन

‘फेसबूक’ आस्थापनाकडून व्यापारी वृत्तीने ‘फेसबूक’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’ अथवा ‘इन्स्टाग्राम’ चालवले जाते. कोणतेही विदेशी आस्थापन जेव्हा भारतात येते, तेव्हा ते त्या देशाची राज्यघटना आणि कायदे यांना बांधील असतात. ते स्वतःच्या कायद्यानुसार वागू शकत नाहीत. ‘फेसबूक’कडूनही देशाची राज्यघटना आणि कायदे यांचे पालन केले जाणे अपेक्षित आहे. जर भारताची राज्यघटना भारताचे नागरिक आणि संस्था यांना भाषणस्वातंत्र्य, तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते अन् त्या चौकटीत राहून कुणी ‘फेसबूक’वर लिखाण करत असेल, तर त्यांना ते स्वातंत्र्य देण्याचे दायित्व ‘फेसबूक’चे आहे. जर कुणी अवैध किंवा असंवैधानिक भाषेत लिखाण करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भारताचे कायदे आहेत. ‘फेसबूक’ हे एक व्यापारी आस्थापन आहे, अन्वेषण यंत्रणा किंवा न्यायालय नाही. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून हिंदु धर्मप्रसार करणार्‍या ‘फेसबूक पेज’वर मनमानी बंदी घालणे, हे भारतीय राज्यघटना आणि कायदे यांचे सरळसरळ उल्लंघन आहे.

मनमानी कारभार करणार्‍या ‘फेसबूक’वर कारवाई करा !

कोणत्याही ‘फेसबूक पेज’वर बंदी घालण्यासाठी किंवा ते निलंबित करण्यासाठी एक लोकशाही व्यवस्था असायला हवी. जर कुणी ‘फेसबूक’च्या नियमांचे उल्लंघन करून लेखन करत असेल, तर ‘फेसबूक’ त्या ‘पेज’च्या ‘अ‍ॅडमिन’ला नोटीस देऊ शकते आणि नोटिशीला उत्तर मिळाले नाही, तर कारवाई करू शकते; मात्र कोणतेही स्पष्टीकरण किंवा पुरावा न देता अचानक एखादे ‘पेज’ बंद करणे, हा मनमानीपणा आहे. हा लोकशाही प्रक्रियेला हरताळ फासण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे ‘फेसबूक’च्या अलोकशाही प्रक्रियेचा केवळ निषेध करून चालणार नाही, तर केंद्र सरकारने ‘फेसबूक’वर कारवाई केली पाहिजे.

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था