दंगलखोर !

देहलीत फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या दंगलीतील एकेकाचा बुरखा आता फाडला जाऊन सत्य बाहेर येत आहे. त्यामुळे पुरो(अधो)गामी, नक्षलसमर्थक, नक्षलप्रेमी, डावे, साम्यवादी, काँग्रेसी यांचे तोंडवळे उतरलेले दिसत आहेत. या दंगलीच्या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या आरोपपत्रात माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी, देहलीतील आम आदमी पक्षाचे माजी तथा स्वराज्य अभियानचे विद्यमान नेते योगेंद्र यादव, देहली विद्यापिठाचे प्राध्यापक तथा मानवाधिकार कार्यकर्ते अपूर्वानंद, तथाकथित अर्थतज्ञ प्रा. जयंती घोष, माहितीपट निर्माते राहुल रॉय आदींच्या नावाचा समावेश केला आहे.

मूळात देहलीतील दंगल ही केंद्र सरकारच्या ‘नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एन्.आर्.सी.) या कायद्यांना विरोध करण्यासाठी करण्यात आली होती. ही दंगल इतकी नियोजितपणे घडवण्यात आली होती की, थेट गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यालाही पद्धतशीरपणे लक्ष्य करण्यात आले होते. या भीषण दंगलीत ५३ लोकांचा मृत्यू झाला, तर ५८१ जण घायाळ झाले. आरोपपत्रात नाव असलेल्या सर्वांनी ‘केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करतांना कोणत्याही सीमा ओलांडा’, अशी चिथावणी दिली होती. यासह ‘नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एन्.आर्.सी.) हे मुसलमानविरोधी असल्याचा अपप्रचार करून मुसलमान समाजाला चिथावण्यात आले, तसेच केंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्यासाठी निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले’, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. हे अत्यंत गंभीर आहे. यावरून ही दंगल किती पूर्वनियोजित होती ?, हे उघड होते. आपचा विद्यमान नगरसेवक ताहिर हुसेन हा या दंगलीमागचा मुख्य सूत्रधार असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. सध्या तो जेरबंद आहे. देहलीच्या वादग्रस्त जवाहरलाल नेहरू विद्यापिठात देशद्रोही घोषणा देणारा उमर खलिद यालाही याच दंगलीच्या प्रकरणी पोलिसांनी नुकतीच अटक केली. आता डावे आणि साम्यवादी यांची आरोपपत्रात नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. यावरून ‘देहली दंगल म्हणजे  ‘सेक्युलॅरिस्ट’, ‘इस्लामिस्ट’ आणि ‘कम्युनिस्ट’ शक्तींचे एकत्रित षड्यंत्र असून या सर्व केवळ हिंदुविरोधी नव्हे, तर देशविरोधी शक्तीही आहेत, हे या दंगलीवरून सिद्ध होते’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?

मूळात साम्यवाद्यांचा इतिहासच रक्तरंजित राहिला आहे. केरळ, बंगाल यांसारखी राज्ये वगळता भारतीय राजकारणात साम्यवाद्यांना राजकीयदृष्ट्या फारसे यश मिळाले नसले, तरी व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक, काही स्तंभ, कामगार चळवळी आदींमध्ये साम्यवाद्यांनी मोठ्या प्रमाणात स्वतःचे बस्तान बसवले. अनेक क्षेत्रांमध्ये असे विखारी लोक आजही बसलेले आढळून येतात. आतून व्यवस्था पोखरण्याचे काम ते पद्धतशीरपणे करत असतात. जे.एन्.यू. सारखी विद्यापिठे ही त्याची उदाहरणे आहेत. धर्मांध, डावे आणि साम्यवादी यांचे वर्चस्व असलेल्या या विद्यापिठात शिक्षणाच्या गोंडस नावाखाली जिहादी आतंकवाद्यांचे उघडउघड समर्थन केले जाते, देशाचे तुकडे करण्याच्या आणाभाका घेतल्या जातात, दंगलीचे षड्यंत्रही रचले जाते ! थोडक्यात राजकीयदृष्ट्या जरी साम्यवादी राजकारणाच्या आघाडीच्या फळीत नसले, तरी त्यांची हिंसक विचारसरणी तसूभरही पालटलेली नाही आणि हेच पोलिसांचे वरील आरोपपत्र सांगते. वाळवीप्रमाणे पोखरता येईल, तेवढी व्यवस्था ते पोखरत असतात. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीस पदासारख्या उच्च पदावरील व्यक्तीचेच नाव जर दंगलीत येत असेल, तर तो संपूर्ण पक्ष कसा असेल ? याचा विचारच न केलेला बरा. अशा पक्षावर सरकारने तात्काळ बंदी घातली पाहिजे. यासह सरकारने देहली दंगलीचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून त्यातील उत्तरदायींवर कठोरात कठोर कारवाईही केली पाहिजे. ही कारवाई इतरांवर जरब बसवणारी आणि दंगली करण्याचा विचारही करतांना मनात धडकी भरवणारी असावी. तरच असे प्रकार रोखले जातील.