घरी मराठीत बोलतांना मुलांकडून हिंदी शब्दांचा अधिक वापर ! – ७० टक्के पालकांचे मत

हिंदी भाषादिनानिमित्त घेतलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष

हिंदी ही राष्ट्रभाषा असली, तरी मराठी ही मातृभाषा आहे. त्यामुळे मराठीत बोलतांना त्यात अन्य भाषांची सरमिसळ होऊ देणे हा भाषाद्रोहच आहे ! मराठी भाषेची अस्मिता आणि सर्व भाषांमध्ये तिचे वेगळे स्थान टिकून रहावे, यासाठी मातृभाषेचे महत्त्व बालपणापासूनच मुलांवर बिंबवणे आवश्यक आहे !

मुंबई – सध्या हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांची सरमिसळ करून मराठी भाषा सर्वत्र बोलली जाते. यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे, असे १४ सप्टेंबर या दिवशी असलेल्या हिंदी भाषादिनानिमित्त १२ शहरांत केलेल्या एका सर्वेक्षणातून आढळून आले. १ सहस्र २०० पालकांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या मातृभाषेत हिंदी शब्दांचाच पुष्कळ प्रभाव असल्याचे ७० टक्के पालकांनी सांगितले. ‘विद्यार्थ्यांच्या तोंडी ‘मुश्किल हैं यार..’, ‘जाने दो, चलता है..’, ‘अच्छा ठीक है..’, ‘मिलते रहेंगे..’, ‘बहोत भूख लगी है..’ असे शब्द सर्रास असतात’, असेही पालकांचे म्हणणे होते.

विद्यार्थीच मधे मधे हिंदी भाषेत बोलत असल्याने पालकांनाही आता तशी सवय लागत आहे, असेही सर्वेक्षणातून समोर आले. ‘याद नहीं आ रहा, पहचानो, भूल गया, बडी मुश्कील है, खडे हो जावो, चलो घुमने जाए, मेरा मतलब हैं की, क्या कर रहे हो, कैसे हो, जल्दी से आओ, खाना खाया क्या, मैने उसको बोला था, सुनताईच नई, बहुत मजा आया, पूछो मत यार, कल-परसों, हो जाएगा, सही जवाब, बिलकुल कर देंगे, मुझे पता नही, मुझे जाना है, किसने बोला, कम से कम’ असे असंख्य हिंदी शब्द मराठी बोलतांना वापरले जात आहेत.