श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन

हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी ‘श्राद्ध’ आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ याउलट श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे वासनायुक्त पितर अनिष्ट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन ते पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते. अन्य संस्कारांइतकाच ‘श्राद्ध’ हा संस्कारही अत्यावश्यक आहे. २ ते १७ सप्टेंबर २०२० या कालावधीत पितृपक्ष आहे. त्यानिमित्ताने श्राद्धविषयक लिखाण येथे देत आहोत.

१८. आपत्कालात श्राद्ध करण्यासंदर्भातील नियम

१. ‘श्राद्धाच्या दिवशी सोयर किंवा सुतक (सुतक म्हणजे अशौच, मृत माणसाविषयी धरावयाचा विटाळ आणि सोयर (सुवेर) म्हणजे जननाशौच) आल्यास ते संपल्यावर पंचगव्य प्राशन करून आणि जानवे बदलून श्राद्ध करावे किंवा सोयर वा सुतक संपल्यावर येणार्‍या अमावास्येस श्राद्ध करावे.

२. श्राद्धाला आरंभ झाल्यानंतर सोयर-सुतक आल्यास, श्राद्ध पुरे होईपर्यंत सोयर-सुतक मानू नये; पण घरातच सोयर-सुतकासारखी घटना घडल्यास श्राद्ध थांबवावे आणि सोयर-सुतक संपल्यावर करावे.

३. प्रतिवर्षी करायचे श्राद्ध मलमासात (अधिक मासात) करू नये.

४. पत्नी रजस्वला झाल्यास वार्षिक श्राद्ध त्याच दिवशी अपिंडक करावे किंवा पाचव्या दिवशी करावे. शक्यतो आमश्राद्ध किंवा हिरण्यश्राद्ध करू नये. त्या दिवसांत महालय करू नये. पाचव्या दिवसानंतर कधीही महालय करता येते.

५. श्राद्धकर्ती रजस्वला झाल्यास पाचव्या दिवशी श्राद्ध करावे.

६. श्राद्ध तिथीला एकादशी आल्यास, श्राद्धीय अन्न उजव्या हातात घेऊन त्याचा केवळ वास घ्यावा आणि ते अन्न गायीला घालावे किंवा हिरण्यश्राद्ध करावे.

७. अशौच असले तरी ग्रहणात स्नान आणि श्राद्ध करावे. ग्रहणश्राद्धाला रात्रीचाही निषेध नाही.

(क्रमशः)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन)

श्राद्धविधीचे लोलकाने निरीक्षण करतांना लक्षात आलेले श्राद्धविधीचे महत्त्व !

श्री. मुकुंद ओझरकर

मी साधनेत येण्यापूर्वी ‘श्राद्ध, पक्ष’ याचा विचार करत नव्हतो. मी साधनेत आल्यावर मला एकेक गोष्ट समजू लागली. प.पू., मी आपल्यामुळे साधनेत आलो आणि आपण बुद्धीपलीकडील विश्‍व आमच्या समोर अलगदपणे उलगडलेत. मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.

१. श्राद्धविधी होत असतांना लोलकाने निरीक्षण करतांना लक्षात आलेली सूत्रे

अ. गडूतील (गाडग्यातील) पाणी सत्त्वगुणी होते. ते पाणी ताम्हनात ओतल्यावर रजोगुणी झाले. त्या ताम्हनातील पाण्यात दर्भ टाकल्यावर ते पुन्हा सत्त्वगुणी झाले.(पूर्वी ‘गडूतूनच पाणी पिण्याचा प्रघात का होता ?’, हे आता समजले.)

आ. ताम्हनातील पाण्यात काळे तीळ टाकल्यावर ते रजोगुणी झाले; म्हणून ते चटरूपी (जेथे देवाचे आणि पितरांचे प्रतीक; म्हणून ब्राह्मण उपलब्ध होत नाहीत, तेथे त्यांचे प्रतीक म्हणून दर्भ वापरतात. त्यांना ‘चट’ असे म्हणतात.) पितरांच्या पूजेसाठी वापरले.

इ. ताम्हनातील पाण्यात जव टाकल्यावर ते पाणी सत्त्वगुणी झाले; म्हणून ते चटरूपी देवतांंच्या पूजेसाठी वापरले.

ई. चटरूपी देव आणि पितर यांना सारख्याच वस्तूंनी सजवले होते, तरी चटरूपी पितरांवर काळे तीळयुक्त जलांनी प्रोक्षण केल्यावर ते रजोगुणी झाले आणि चटरूपी देवतांवर सत्त्वगुणी जलाने प्रोक्षण केल्यावर ते सत्त्वरूपीच होते.

उ. जानवे धारण केलेले असतांना ते सत्त्वरूपी असते; परंतु विधीनंतर ते विसर्जन करतांना ते रजोगुणी झाले.

ऊ. पूजेत जानवे सव्य केल्यावर (डाव्या खांद्यावरून असतांना) शरीर सत्त्वगुणी होते; परंतु ते अपसव्य केल्यावर (उजव्या खांद्यावरून असतांना) लोलक स्थिर राहिला. त्याने कोणतेही स्पंदन दर्शवले नाही.

ए. भाताचे पिंड केल्यावरही लोलक स्थिर राहिला; परंतु पूजा झाल्यावर पिंडात रजोगुण आला.

ऐ. ‘श्राद्धविधी होतांना प्रमुख पितरांसह अनेक पितर आलेे आहेत आणि ते आनंदाने आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले. मला संपूर्ण दिवस घरात आनंदाची स्पदंने जाणवत होती.

२. भोजन झाल्यावर मला गाढ झोप लागली. ही झोप काहीतरी वेगळीच होती.’            

– श्री. मुकुंद ओझरकर, नाशिक (२६.९.२०१९)