केवळ ग्रह शुभ स्थितीत असतांनाच नव्हे, तर सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात राहिल्यास सर्वथा लाभ होत असणे

‘१३.९.२०२० या दिवशी सकाळी १० वाजून ३६ मिनिटांनंतर शुक्र ग्रह वगळता रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शनि, राहू आणि केतू हे आठ ग्रह त्यांच्या स्वराशीत किंवा उच्च राशीत आहेत. यासाठी सकाळी १० वाजून ३६ मिनिटांनंतर देवतांची उपासना करणे लाभदायक आहे’, असा संदेश सर्वत्र पाठवला जात होता. यासंदर्भात ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण पुढीलप्रमाणे आहे.

सौ. प्राजक्ता जोशी

१. सर्व ग्रह शुभ फळ देण्याचा काळ एकाच दिवशी नसणे : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह शुभ अथवा अशुभ असल्यावर त्याचे फळ देण्याचा काळ ठरलेला असतो. १३.९.२०२० या दिवशी रवि, चंद्र, मंगळ, गुरु आणि शनि हे पाच ग्रह त्यांच्या स्वराशीत आहेत. बुध, राहू आणि केतू हे ग्रह उच्च राशीत आहेत; परंतु असे असले, तरीही सर्व ग्रह शुभ फळ देण्याचा काळ एकाच दिवशी नाही. ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा ग्रह सर्वकाळ फळ देतो; परंतु इतर ग्रहांचा फळ देण्याचा कालावधी निराळा आहे.

२. रवि ग्रहाची स्थिती : रवि ग्रह एका राशीत १ मास असतो. हा ग्रह यातील पहिले पाच दिवस फळ देतो; परंतु १३.९.२०२० या दिवशी तसे नव्हते. १३.९.२०२० या दिवशी रवि ग्रह सिंह राशीत साडेसव्वीस अंशावर आहे. १६.९.२०२० या दिवशी रवि ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

३. १३.९.२०२० या दिवशी भाद्रपद कृष्ण पक्ष एकादशी, म्हणजे ‘इंदिरा एकादशी’ आहे. भगवान श्रीविष्णूची उपासना करायला ही तिथी लाभदायक आहे.

४. सनातन संस्थेने सांगितलेल्या साधनामार्गानुसार अष्टांग साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

५. केवळ ग्रह शुभ स्थितीत असतांनाच नव्हे, तर सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात राहिल्यास सर्वथा लाभ होतो.’

– सौ प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा. (१२.९.२०२०)