(अ)शांतता प्रक्रिया ?

आतंकवादी संघटना तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यातील पहिल्या शांतता बैठकीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी संबोधित केले. त्यांनी या शांतता प्रक्रियेला भारताचा पाठिंबा घोषित केला आणि त्याच वेळी, ‘अफगाणिस्तानच्या भूमीचा भारतविरोधी कारवायांसाठी कधीही वापर केला जाऊ नये’ अशी अपेक्षा व्यक्त केली. अफगाणिस्तान हा भारताच्या शेजारील देशांपैकी एक देश आहे. अफगाणिस्तानच्या ३४ प्रांतांमध्ये ४०० प्रकल्प पूर्ण करून भारताने खंगलेल्या अफगाणिस्तानच्या उभारणीत भरीव योगदान दिले आहे. तेथील संसदही भारताने बांधून दिली आहे. त्यामुळे भारतासाठी अफगाणिस्तान तसा विशेष महत्त्वाचा आहे.

वर्ष २००१ मध्ये अमेरिकेच्या ‘ट्वीन टॉवर’वर आणि अन्य ठिकाणी अल-कायदा या आतंकवादी संघटनेने आक्रमण केले. याचा त्वरित प्रतिशोध घेण्यासाठी अमेरिकेने तिचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये उतरवले आणि तेथील आतंकवाद्यांचा नायनाट करण्यास प्रारंभ केला. गेली १८-१९ वर्षे अमेरिकी सैन्य तेथेच तळ ठोकून होते. आक्रमणाचा सूत्रधार आणि आतंकवाद्यांचा म्होरक्या ओसामा-बिन-लादेन याला ठार केल्यानंतरही अमेरिकेचे सैन्य तेथे कार्यरत आहे. या वर्षी फेब्रुवारी मासात अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतता करार झाला. त्यानुसार अमेरिकेने १४ मासांमध्ये तिचे सैन्य टप्प्याटप्प्याने अफगाणिस्तानमधून न्यून करण्याचे ठरले आहे; मात्र ८ सहस्र ६०० एवढे सैन्य तेथेच तैनात असणार आहे. तशी अटच करारात अंतर्भूत आहे. तालिबान आणि अफगाण सरकार यांच्यात सशस्त्र संघर्ष चालू आहे. तालिबान तशी जुनी आतंकवादी संघटना आहे. तिला अफगाणिस्तानमध्ये इस्लामी सरकार, इस्लामच्या कायद्यानुसार चालणारे सरकार स्थापन करायचे आहे. त्यासाठी अफगाणिस्तानमधील एक एक प्रदेश कह्यात घेऊन तेथे त्यांचे शासन स्थापन करणे, इस्लामी कायद्यानुसार कारभार करणे असे अपेक्षित आहे. तालिबानचा पाकिस्तानच्या हक्कानी नेटवर्क या आणि अन्य आतंकवादी संघटना यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत.

तालिबान आणि पाक यांचे संबंध

तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातही तसे साटेलोटे आहे. पाकच्या पुढाकारानेच तालिबान आणि अमेरिका यांच्यात शांततेची बोलणी चालू झाली आहे. पाक याचे श्रेय घेत आहे, असे म्हटले काय किंवा पाकच्या प्रयत्नाने झाले काय यामागे पाकचा सुप्त हेतू निश्‍चितपणे आहे. तसे पाकमध्ये लोकनियुक्त सरकारचे मूल्य अल्प असते आणि आतंकवादी नियंत्रित सैन्याचे महत्त्व अधिक आहे. अन्य शब्दांत सैन्यच तेथे सरकार चालवते. त्यामुळे पाकच्या सैन्याचाच अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांततेची बोलणी चालू करण्यास हात आहे, असे म्हणू शकतो.

अफगाण सरकारपेक्षा तालिबानचा पगडा तेथील प्रदेशावर काही ठिकाणी अधिक आहे; मात्र आधुनिक विचारसरणीच्या अफगाणींना तालिबान नको आहे. तालिबान कट्टर इस्लामी विचारधारेवर चालत असल्याने स्त्रियांचे अधिकार हिरावले जातात अथवा त्यांची छळवणूक होते. तालिबानच्या मदरशांमधून कट्टर इस्लामी विचारसरणीच शिकवली जाते. परिणामी त्यातून आतंकवादाला खतपाणीच घातले जाणार आहे आणि देशातील सुधारणांना विरोध होण्याची शक्यता आहे. तालिबानच्या मदरशांमधून काही पाकिस्तान्यांनी कट्टरतेचे शिक्षण घेऊन पाकमध्ये धुडगूस घातला आहे. या मदरशांचा पाकच्या काही भागावरही प्रभाव आहे. तालिबान ही अल-कायदाप्रमाणे एक आतंकवादी संघटना असली, तरी तिला तथाकथित शैक्षणिक कार्य करून स्वत:चा सोज्वळ चेहरा सिद्ध करायचा आहे. एकदा का अफगाण्यांचा विश्‍वास संपादन केला की, नंतर ही संघटना कधी उठाव करून अफगाणिस्तान नियंत्रणात आणेल, याचा नेम नाही. असे झाल्यास त्यांच्या कह्यातून अफगाणिस्तान सोडवण्यासाठी मोठे युद्ध करण्यावाचून पर्याय नसेल.

भारताने तालिबानला दमात घ्यावे

भारत पाकपुरस्कृत आतंकवादाचा गेली अनेक दशके लक्ष्य राहिला आहे. पाक आणि पाकव्याप्त काश्मीर येथे चाललेले आतंकवाद्यांचे तळ हे भारतासाठी डोकेदुखी बनले आहेत. प्रतिदिन सैन्याचा संघर्ष या आतंकवाद्यांशी होत असतो आणि त्यात हकनाक सैनिक हुतात्मा होत असतात. अफगाणिस्तान आतंकवाद्यांच्या कह्यात सापडल्यास भारताला २ आघाड्यांवर लढाई लढावी लागेल. २ वर्षांपूर्वी काश्मीर येथील स्थितीविषयी तालिबानने विधान केले होते. ‘काश्मीरला स्वतंत्र करण्यात तालिबानी स्थानिक आतंकवाद्यांसमवेत लढा देतील’, अशा आशयाचे ते विधान होते. त्यानंतर कुणाचा दबाव म्हणा अथवा भारताची सैन्यशक्तीची भीती म्हणा तालिबानने ते विधान २ दिवसांमध्ये मागे घेऊन आमचा काश्मीर येथे काहीही करण्याचा विचार नाही, असे सांगितले.

वर म्हटल्याप्रमाणे पाकचे छुपे हेतू यामध्ये एक म्हणजे अफगाणिस्तानची सहानुभूती मिळवून त्याला भारताविरोधात उभे करणे आणि दुसरा तेथील आतंकवाद्यांच्या द्वारे काश्मीरमध्ये संघर्ष पेटता ठेवणे. पाकने कधी काही आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढाकार घेऊन कृती केली, तरी त्याचा ‘अजेंडा’ काश्मीरच असतो. तालिबानी आतंकवाद कधी उचल खाईल आणि नागरिकांचे जिणे नकोसे करेल, याची अमेरिकेलाही भीती वाटत असावी. त्यामुळेच त्यांनी सर्व सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतलेला नाही. क्रूर तालिबान आणि मवाळ अफगाण यांच्यात तसा ३६ चा आकडा असला, तरी जगासमोर काहीतरी दिखावा निर्माण करण्याचा तालिबानचा प्रयत्न आहे. मध्यंतरी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमधील आतंकवादाकडे भारत लक्ष देत नाही, असे सूचक विधान करून भारताला लक्ष ठेवण्यास अप्रत्यक्षपणे सांगितलेच आहे. भारताने तालिबानच्या आणि त्यामागील पाकच्या नौटंकीला न भूलता वरचेवर चेतावण्या देऊन त्यांना दमात ठेवणे भारतातील शांततेच्या दृष्टीने आवश्यक ठरणार आहे, असे राष्ट्रप्रेमींना वाटते.