समाजजागृती करून काशी विश्‍वनाथ मंदिरामध्ये बंद केलेली आरती चालू करण्यासाठी सरकारला भाग पाडले ! – श्री. आशिष धर, सहसंस्थापक, ‘प्रज्ञता’, नवी देहली

(ऑनलाईन) ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या दुसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रात मान्यवरांचे विचार !

नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन २०२०

फोंडा, १ ऑगस्ट (वार्ता.) – काशी विश्‍वनाथ मंदिरात गेल्या १ सहस्र वर्षांपासून प्रतिदिन ‘सप्तर्षि’ आरती करण्याची परंपरा आहे. कोरोना महामारीच्या काळात ही प्रथा नियुक्त सरकारी कर्मचार्‍यांनी रहित करण्याचा निर्णय घेतला. ही प्रथा औरंगजेबाच्या काळातही खंडित झाली नाही, ती सरकारच्या नियंत्रणामुळे रहित झाली. याविषयी आम्ही व्हिडिओ प्रसारित केला. त्यातून समाजजागृती झाल्याचे लक्षात येताच सरकारने त्यावरील बंदी उठवली गेली. मंदिरातील आरती पुन्हा नियमित चालू झाली. सरकारच्या वतीने केवळ मंदिरांचेच सरकारीकरण करण्यात येते. मशीद आणि चर्च यांचे सरकारीकरण का करण्यात येत नाही ?, असा प्रश्‍न नवी देहलीतील ‘प्रज्ञता’ या संस्थेचे सहसंस्थापक श्री. आशिष धीर यांनी उपस्थित केला. ते (ऑनलाईन) नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीच्या पहिल्या उद्बोधन सत्रात बोलत होते.

श्री. आशिष धीर

ते पुढे म्हणाले, ‘‘आमच्या संस्थेच्या वतीने समाजातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांविषयीची माहिती पोचवण्याच्या हेतूने व्हिडिओ बनवून प्रसारित केले जातात. आतापर्यंत आम्ही ‘विस्थापित काश्मिरी पंडित’, ‘राममंदिराची उभारणी’, ‘बांगलादेशी हिंदूंची व्यथा’, ‘जोगेंद्रनाथ मंडल (पाकिस्तानचे पहिले कायदेमंत्री) यांचा जीवनपट’, ‘काशी विश्‍वनाथ मंदिरात आरती करण्यास घालण्यात आलेली बंदी’ या विषयांवर व्हिडिओ बनवून सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले आहेत. त्यांस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहेे.’’ दुसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रात सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी शरण, तसेच राजस्थानमधील ‘निमित्तेकम’ संस्थेचे अध्यक्ष श्री. जय आहुजा यांनी मार्गदर्शन केले. दुसर्‍या सत्रात ‘तमिळनाडूतील जिहादी आणि ख्रिस्ती शक्तींचे वाढते वर्चस्व’ या विषयावर हिंदु मक्कल कत्छीचे अध्यक्ष अर्जुन संपथ, तमिळनाडूतील शिवसेनेचे अध्यक्ष श्री. जी. राधाकृष्णन् आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

तामिळनाडू सरकारकडून मुसलमानांचे लांगूलचालन, तर हिंदूंशी भेदभाव ! – श्री. अर्जुन संपथ, संस्थापक अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी, तामिळनाडू

श्री. अर्जुन संपथ

‘कोरोना वाहका’ची भूमिका निभावणार्‍या तबलिगी जमातच्या देहलीतील कार्यक्रमाला तमिळनाडूमधून २ सहस्र ५०० हून अधिक लोक सहभागी झाले होते. ते राज्यात परतल्यानंतर त्यांना पुष्कळ वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या. कोरोना आजारातून बरे झाल्यावर प्रशासकीय अधिकार्‍यांनी त्यांचे रुग्णालयात जाऊन स्वागत केले. त्यांना कुराण देण्यात आले. हा प्रकार अनाकलनीय आहे. याउलट हिंदूंशी वैद्यकीय साहाय्य पुरवण्यात भेदभाव केला जात आहे. मंदिरांची भूमी असलेल्या तामिळनाडूतील सर्व मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत. या मंदिरांची अक्षरशः लूट चालू आहे. दुसरीकडे तमिळनाडू सरकारने मुसलमानांचे लांगूलचालन करत त्यांना रमझानच्या काळात ४ सहस्र ५०० मेट्रिक टन तांदूळ दिले. याचे वाटप सरकारी यंत्रणांकडून नव्हे, तर मशिदींमधून करण्यात आले.

१. तामिळनाडूमध्ये ख्रिस्ती अनुमाने ६ टक्के, तर मुसलमान १० टक्के आहेत. राज्यात हिंदू बहुसंख्य असूनही राजकारणामध्ये ख्रिस्ती आणि मुसलमान यांचे वर्चस्व आहे. तेथे हिंदूंच्या  देवतांच्या मूर्ती आणि भारतमातेचा पुतळा यांना उघडपणे विरोध केला जातो.

२. तमिळनाडूमध्ये हिंदूंच्या नेत्यांच्या हत्या केल्या जातात. नक्षलवाद्यांच्या कारवायाही चालू आहेत. जिहादी, धर्मांध ख्रिस्ती, साम्यवादी, तसेच नक्षलवादी यांच्या कार्यपद्धती वेगळ्या असल्या, तरी ‘हिंदुद्वेष आणि भारतविरोध’ हा त्यांच्यातील समान धागा आहे.

३. आज तामिळनाडूमध्ये काश्मीरसारखा जिहादी आतंकवाद फोफावत आहे. राज्यात शिक्षण आणि वैद्यकीय साहाय्य या माध्यमांतूनही धर्मांतराच्या कारवाया केल्या जात आहेत.

४. तमिळनाडूमध्ये चालू असलेल्या या हिंदुविरोधी कारवायांना हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने विरोध करायला हवा.