पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्यास दोषींना कारागृहात टाकल्याविना रहाणार नाही ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूचे प्रकरण

मुंबई – सुशांत सिंह यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांचे अन्वेषण योग्य दिशेने चालू आहे. याविषयी कुणाकडे ठोस पुरावे असतील, तर ते पोलिसांकडे द्यावेत. त्यामध्ये तथ्य आढळल्यास दोषींना कारागृहात टाकल्याविना रहाणार नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वरील वक्तव्य केले.

(सौजन्य : ABP NEWS)

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘सुशांत यांच्या चाहत्यांनी महाराष्ट्र शासनावर विश्‍वास ठेवावा. महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांत वाद लावण्यासाठी जे कुणी राजकारण करत आहेत, त्यात फरफटत जाऊ नये. पुरावे दिल्यानंतर शासनाने कारवाई केली नाही, तर नक्कीच तुम्ही आम्हाला विचारणा करा. मी स्वार्थासाठी मुख्यमंत्रीपदाच्या आसंदीत बसलेलो नाही, तर जनतेची काळजी घेण्यासाठी हे दायित्व स्वीकारले आहे. शासन नुसते बोलून नाही, तर करून दाखवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझा समन्वय आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात केलेली प्रत्येक विनंती त्यांनी मान्य केली आहे आणि साहाय्याचा हात दिला आहे. कदाचित याचीच पोटदुखी राज्यातील त्यांच्या नेत्यांना झाली असेल.’’