सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

सिंधुदुर्ग (जि.मा.का.)- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त सुचनेनुसार जिल्ह्यात १ ते ४ ऑगस्ट या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण महाराष्ट्र,  तसेच गोवा राज्याच्या समुद्रकिनार्‍यावर या कालावधीमध्ये सुमारे ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वहाणार असून समुद्र खवळलेला रहाणार आहे. त्या अनुषंगाने मासेमारांनी या कालावधीमध्ये मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

सातत्याने पडणार्‍या पावसामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने योग्य ती सावधानता बाळगावी. तालुक्यातील बचाव आणि शोध पथके, सेवाभावी संस्था, पट्टीचे पोहणारे यांच्या संपर्कात रहावे. पुराचे पाणी येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणचे नागरिक आणि दरड कोसळू शकणार्‍या भागातील नागरिक यांच्याविषयी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिल्या आहेत.