सावंतवाडी नगरपालिकेने राबवलेल्या अनधिकृत ‘स्टॉल हटवा’ मोहीमेवर विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींचा आक्षेप

आज होणार्‍या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

  • इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत ‘स्टॉल्स’ निर्माण होईपर्यंत पालिका प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायी असलेल्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !
  • व्यापक जनहित लक्षात घेता लोकप्रतिनिधींनी अनधिकृत बांधकामांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठीशी घालणे अपेक्षित नाही !

सावंतवाडी – सावंतवाडी नगरपालिकेने शहरात राबवलेली ‘स्टॉल हटवा’ मोहीम वादात सापडली आहे. व्यापारी, तसेच विरोधी पक्ष यांना विश्‍वासात न घेता ही मोहीम राबवण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे. ही मोहीम राबवल्यानंतर सामाजिक अंतराचा विचार न करता व्यापारी आणि भाजी विक्रेते यांना दिलेल्या जागेमुळे कोरोनाचे संकट निर्माण झाल्यास, त्याला नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी उत्तरदायी असतील. काही झाले, तरी आम्ही कुणावर अन्याय होऊ देणार नाही, अशी चेतावणी शिवसेनेच्या नेत्यांनी दिली. या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सावंतवाडी बाजारपेठेत २ दिवसांपूर्वी ‘स्टॉल हटवा’ मोहीम राबवण्यात आली होती. कोरोनामुळे उपजिविकेचे साधन हिरावले असतांना, तसेच पावसाळ्यात ही मोहीम राबवून नगरपालिकेने व्यापार्‍यांवर अन्याय केला आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला. या पार्श्‍वभूमीवर ३० जुलैला शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नंतर बाजारपेठेत जाऊन व्यापार्‍यांची भेट घेतली. या वेळी व्यापार्‍यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. व्यापार्‍यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर नगरपालिकेतील शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या अनारोजीन लोबो यांनी, ‘नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी घटनास्थळी येऊन योग्य तो निर्णय घ्यावा’, असे आवहन केले, तसेच त्यांनी मुख्याधिकारी जिरगे यांना बोलावले; मात्र मुख्याधिकारी जिरगे यांनी घटनास्थळी येण्याचे टाळत ‘अन्य कर्मचार्‍याला पाठवतो’, असे सांगितले. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून तहसीलदारांना येथे बोलावण्यात आले. त्यांनी तत्काळ बाजारपेठेत येऊन समस्या समजून घेतली. या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.

महाविकास आघाडीने केला मुख्याधिकार्‍यांचा निषेध

या वेळी बोलावूनही नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी घटनास्थळी येण्याचे टाळल्याने महाविकास आघाडीच्या संतप्त पदाधिकार्‍यांनी मुख्याधिकार्‍यांचा निषेध केला. शेवटी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी, ‘३१ जुलैला याविषयी विशेष बैठक बोलावून येत्या २ दिवसांत तोडगा काढू’, असे आश्‍वासन दिले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी तात्पुरती माघार घेत असल्याचे सांगितले.

स्वराज्य संघटना आणि सावंतवाडी नागरिक कृती संघर्ष समिती यांच्या पदाधिकार्‍यांनी सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जिरगे यांची भेट घेऊन त्यांना कोरोना महामारीच्या काळात भाजी विक्रेत्यांवर भरपावसात केलेल्या कारवाईविषयी खडसावले.