सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी बिहार पोलिसांचा हस्तक्षेप योग्य नाही ! – शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री

गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येचे मुंबई पोलीस पहिल्या दिवसापासून गांभीर्याने अन्वेषण करत आहेत. यामध्ये आवश्यक वाटते त्या सर्वांची चौकशी मुंबई पोलिसांनी केली आहे. भविष्यातही आवश्यकतेनुसार संबंधितांची चौकशी करण्यात येईल. त्यामुळे बिहार पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करणे योग्य नाही, असे मत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केले.

या वेळी शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘अन्य राज्यात जाऊन अन्वेषण करण्याविषयी एक नियमावली आहे. त्यानुसार बिहारच्या पोलिसांनी महाराष्ट्रातील गृहविभागाची अनुमती घेणे बंधनकारक आहे. त्याविना अन्वेषण करणे उचित नाही. सुशांत यांच्या आई-वडिलांकडूनही पोलिसांनी माहिती घेतली आहे. त्यांना अन्य काही सांगायचे असल्यास त्यांनी मुंबई पोलिसांकडे ती माहिती द्यावी.’’