‘सायबर’ गुन्ह्यांतील ७ कोटींहून अधिक रुपये परत मिळवण्यात ‘सायबर’ पोलिसांना यश

पुणे – गेल्या सहा मासांत ‘सायबर’ गुन्हेगारांनी चोरलेले ५३१ जणांचे ७ कोटी ८७ लाख ८४ सहस्र ७४९ रुपये ‘सायबर’ पोलिसांनी मिळवून दिले आहेत.दळणवळण बंदीमुळे सध्या ‘इंटरनेट’च्या वापराचे प्रमाण वाढले आहे. त्याचा अपलाभ घेउन ‘सायबर’ गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. अनेकदा खातेदाराने गोपनीय क्रमांक ‘शेअर’ केला नसतांनाही ‘सायबर’ गुन्हेगार शिताफीने अधिकोष खात्यातील रक्कम ‘ऑनलाईन’ ‘ट्रान्स्फर’ करतात.

‘डेबिट क्रेडिट कार्ड’च्या माध्यमातून पैसे चोरीला गेल्याच्या तक्रारींमध्ये ४ कोटी ५४ लाख ९९ सहस्र ४०७ रुपये पोलिसांनी परत मिळवून दिले, तर नोकरीच्या आमिषाने फसवणूक झालेल्या १८९ तक्रारींपैकी बहुतांश युवकांना ५५ लाख ९४ सहस्र ६९६ रुपये परत करण्यात आले आहेत. कोणालाही गोपनीय क्रमांक ‘शेअर’ करू नका, ‘सायबर’ चोरांपासून सावध रहा, तरीही फसवणूक झाल्यास त्वरित ‘सायबर’ पोलीस आणि अधिकोष यांच्याशी संपर्क साधा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.