महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला कोरोनामुक्त कर !

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे

पंढरपूर, १ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला कोरोनामुक्त कर आणि शेतकर्‍यांना सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची १ जुलैच्या पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि श्री. तेजस ठाकरे उपस्थित होते.

(सौजन्य : ABP MAJHA)

१. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेस पहाटे २ वाजता प्रारंभ झाला. आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी नगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल बढे आणि सौ. अनुसया बढे या दांपत्यासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांनी केली.

२. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले की, राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या श्री विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो आहे. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी साहाय्य करणार असून त्यासाठी विकास प्रकल्पांना संमती दिली जाईल. त्याविषयीचे प्रस्ताव सादर करावेत.

३. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांसह नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने पंढरपूर येथे येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण आणि पूजा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी संप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याविषयी त्यांनी आभार मानले. या वेळी पंढरपूर नगर परिषदेस शासनाच्या वतीने ५ कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे देण्यात आला.