जळगाव येथे मद्याचे घोट घेणारा राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक नरेंद्र दहिवडे निलंबित

अवैध मद्यविक्रीवर बंदी घालणे हे राज्य उत्पादन विभागातील निरीक्षकांचे काम असतांना स्वतः मद्य पिणारे असे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करण्याच्या पात्रतेचे आहेत का ? अशा कर्मचार्‍यांना नुसते निलंबित न करता त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करणे आवश्यक आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक नरेंद्र दहिवडे

जळगाव – परमीट रूम आणि बियरबार यांमधील कागदोपत्री दप्तराची पडताळणी करत असतांना मद्याचे घोट घेणारे राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक नरेंद्र दहिवडे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही कारवाई केली असून त्याविषयीचे आदेश राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात प्राप्त झाले आहेत.

(सौजन्य : Zee 24 Taas)

दहिवडे हे मद्याचे घोट घेत असतांनाचा व्हिडीओ २ दिवसांपूर्वी सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता. त्याची वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर नोंद घेतली होती.