ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतही १२ जुलैपर्यंत कडक दळणवळण बंदी

ठाणे, १ जुलै (वार्ता.) – शहरांतील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ठाणे आणि कल्याण-डोंबिवली येथेही कडक दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे. या महानगरपालिकांच्या क्षेत्रात २ जुलै या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून १२ जुलै या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत ही दळणवळण बंदी असणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अध्यादेश काढत संपूर्ण ठाणे शहरात दळणवळण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही हा निर्णय घोषित केला आहे.

१. अत्यावश्यक वस्तू, सेवा प्रदान करणारी दुकाने, आस्थापनांना वरील प्रतिबंधातून वगळण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली येथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकाने (डेअरी), बेकरी, किराणा दुकाने, भाजीपाला इत्यादी खाद्यपदार्थ यांची दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत चालू रहातील, असे सांगण्यात आले आहे.

२. ज्या व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे, त्या व्यक्तीने नियमाचे पालन करणे बंधनकारक असून त्या व्यक्तीने अगर तिच्या कुटुंबियांनी नियमांचे पालन केले नाही, तर कारवाई होणार आहे.

३. ठाणे जिल्ह्यात ३० जूनपर्यंत ३३ सहस्र ३२४ जण कोरोनाबाधित झाले आहेत. यांपैकी १५ सहस्र ६८९ जणांवर उपचार चालू असून १६ सहस्र ५७१ जण उपचारांनंतर बरे झाले आहेत, तर १ सहस्र ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत ३ सहस्र ८३९ रुग्णांवर उपचार चालू असून ४ सहस्र ६०७ जण उपचारांनंतर बरे झाले आहेत, तर ३२६ जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत ४ सहस्र ६६ रुग्णांवर उपचार चालू असून २ सहस्र ३८९ जण उपचारांनंतर बरे झाले आहेत, तर १२० जणांचा मृत्यू झाला आहे.