श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या संदर्भात पंढरपूरचे विठ्ठलभक्त श्री. बाळासाहेब बडवे यांना आलेली अनुभूती आणि त्यांची जाणवलेली भक्ती

श्री. बाळासाहेब बडवे
श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

‘श्री. बाळासाहेब बडवे हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त आहेत. ते भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह आणि सामाजिक प्रबोधन यांवर लिखाणही करतात. त्यांनी पुजारी म्हणून पांडुरंगाची ४० वर्षे सेवा केली आहे. महाराष्ट्रामध्ये दौर्‍यावर असतांना श्रीचित्‌शक्‍ति सौ. गाडगीळकाकू प्रथमच श्री. बाळासाहेब बडवे यांना भेटण्यास गेल्या होत्या. ही गोष्ट वर्ष २०११ – १२ ची असावी. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळकाकूंच्या पहिल्याच दर्शनात बडवेकाकांना सुंदर अनुभूती आली.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळकाकूंच्या ठिकाणी त्यांना अष्टभुजादेवीचे दर्शन झाले आणि हे पाहून बडवेकाका अगदी भारावून गेले. त्यांनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळकाकूंचे चरणच पकडले. एकदाच नव्हे, तर ४ – ५ वेळा त्यांनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळकाकूंना नमस्कार केला. ते त्या वेळी ७४ वर्षांचे होते; पण श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळकाकूंना ते ‘आई’ म्हणूनच संबोधतात.

घरात आल्यावर त्यांना सूक्ष्मातून पांडुरंगाने सांगितले, ‘आईला बसण्यासाठी आदरपूर्वक पाट दे.’ यामुळे त्यांची श्रीचित्‌शक्‍ति सौ. गाडगीळकाकूंवरील श्रद्धा आणखी दृढ झाली. त्यांचा एवढा भोळाभाव आहे की, ते श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळकाकूंना म्हणतात, ‘‘आई, तुम्ही केवळ एकदा माझ्या डोक्यावर हात ठेवा, म्हणजे मला शक्ती मिळेल. त्यामुळे समाज आणि मंदिर यांमध्ये ज्या अयोग्य गोष्टी चालू आहेत, त्याविरुद्ध लढण्यासाठी मला बळ मिळेल.’’

‘हिरा कसाही आणि कुठेही असला, तरी त्याची चकाकी लपून रहात नाही’, तसेच अवतारी जिवांचे आहे. ते संतपदाला, गुरुपदाला पोचलेले असो वा नसो; पण त्यांच्याविषयीच्या अनुभूती भाव आणि भक्ती असणार्‍याला देव नक्कीच देतो.’

– श्री. दिवाकर आगावणे, पंढरपूर, महाराष्ट्र. (३१.१.२०१७)

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा श्री. बडवे यांच्याविषयी असलेला विठ्ठलभाव आणि श्री. बडवे यांनी श्री विठ्ठलाला घातलेला तुळशीचा हार परात्पर गुरुदेवांसाठी आशीर्वाद म्हणून देणे !

श्री. बाळसाहेब बडवे यांनी कधी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंची आठवण काढली की, ‘श्री विठ्ठलानेच आपले स्मरण केले आहे’, असा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंचा भाव असतो.

ज्या वेळी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू श्री. बाळासाहेब बडवे यांना भेटल्या, त्या वेळी त्यांनी श्री विठ्ठलाला घातलेला तुळशीचा हार परात्पर गुरुदेवांसाठी आशीर्वाद म्हणून दिला. ‘देवाची भावपूर्ण सेवा केलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून स्थूल रूपाने देव आता सनातन संस्थेच्या कार्याला ऊर्जा पुरवत आहे’, हे या प्रसंगातून लक्षात येते.

संग्राहक : श्री. दिवाकर आगावणे, रामनाथी, गोवा. (२५.३.२०२०)

प.पू. भक्तराज महाराज यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला पेढा भरवणे आणि तोच पेढा पांडुरंगाने भक्ताच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भरवणे

‘पंढरपूरचे विठ्ठल भक्त श्री. बाळासाहेब बडवे ३ – ४ वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सनातनच्या रामनाथी आश्रमात भेटण्यास आले होते. त्या वेळी त्यांनी पांडुरंगाला घातलेला तुळशीचा हार पंढरपूरवरून गोव्याला आणला होता. तो पांडुरंगाच्या चैतन्यशक्तीने भारित झालेला हार श्री. बाळासाहेब बडवे यांनी परात्पर गुरुदेवांच्या गळ्यात घातला. त्यांनी समवेत विठ्ठलाचा प्रसाद म्हणून पेढे आणले होते. हे पेढे त्यांनी स्वतः पांडुरंगाच्या मुखाकडे नैवेद्य म्हणून त्याच्या मुखाला लावून आणले होते. श्री. बडवेकाकांनी त्यांच्या हाताने परात्पर गुरुदेवांना तो पांडुरंगाचा प्रसाद भरवला. तेव्हा परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘प.पू. भक्तराज महाराजांनी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला पेढा भरवला होता आणि पांडुरंगाने तो खाल्लाही होता. आज पांडुरंगाने तोच पेढा स्वतः रामनाथीला येऊन पुन्हा मला भरवला.’’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक