पंढरपूरच्या वारीचा आरंभ, स्वरूप आणि वैशिष्ट्ये

पंढरपूर यात्रा असल्याच्या निमित्ताने…

पंढरीतील भक्तीचा महिमा वाढवणारी भक्त आणि भगवंत यांची एकरूपता : पंढरपूरला पुंडलिकाच्या भेटीला जाणारा पांडुरंग हा ‘पहिला वारकरी’ आहे. त्यामुळे त्याची पूजा, म्हणजे भक्ताचीच पूजा आहे. अशा या भक्तीमहिम्यामध्ये रंगलेला पांडुरंग पंढरपूरला राहिल्यामुळे ते मोठे ‘शक्तीकेंद्र’ झाले आहे. ते सर्व वारकरी भक्तांना आकर्षित करते; म्हणूनच इथे ‘पंढरीचा वारकरी’ म्हटले आहे. येथे ‘पंढरीचा वारकरी पांडुरंग’ असे न म्हणता केवळ ‘वारकरी’ म्हटले; कारण ‘पांडुरंग’ हा (शब्द) यात अध्याहृत आहे. तो प्रत्येकाच्या हृदयातील गुहेत आत्मस्वरूपाने अंतर्भूत होऊन विसावला आहे.

भक्तांच्या सेवेत आनंद घेणारा कर्मयोगी पांडुरंग ‘आदर्श वारकरी’ असणे : पांडुरंगाला भगवंत होऊन रहाण्यात जेवढा आनंद आहे, त्याहून अधिक आनंद त्याला स्वतः भक्त होण्यात आहे, म्हणजे त्याला भक्ताची सेवा करण्यात विशेष आनंद आहे. महाभारत युद्धात श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले. संत जनाबाईचे दळण दळले. संत एकनाथाघरी ‘श्रीखंड्या’ म्हणून पाणी भरले. अशी त्याची कितीतरी उदाहरणे देता येतील. तो पंढरपूरला साधा, भोळा, सावळा अशा रूपात सामान्याहून सामान्य झाला आहे. यामुळेच तो सर्वांचा ‘आदर्श असा वारकरी’ आहे. त्याच्यामुळे पंढरपूर ‘महायोगपीठ’ झाले आहे. तो कर्मयोगी आहे. तो कष्टकरी अन् शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा जीवलग होऊन निरंतर २८ युगे तिष्ठत भक्तांची वाट पहात उभा आहे.

आनंदाचा प्रसाद सर्व भक्तगणांना देण्यासाठी पांडुरंग पंढरपुरात तिष्ठत उभा असणे : पांडुरंगाला भक्तांची ओढ असल्याने तो त्याचे विराट स्वरूप असूनसुद्धा सामान्य जनांसाठी सामान्य झाला. यालाच ‘अवतार’ असे म्हणतात. या कारणानेच संत त्याच्या भेटीसाठी वेडावलेले असतात. भक्त-भगवंताच्या या भेटीमुळे महारसाच्या आस्वादनाचा आनंद दोघांनाही मिळतो. ते दोघेही एकरूप होऊन जातात; म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘तेथे आनंदाविना काहीच रहात नाही.’’ हा आनंदाचा प्रसाद सर्व भक्तगणांना देण्यासाठीच पांडुरंग पंढरपूूरला तिष्ठत उभा आहे. त्याला अन्य काही नको असते. तो केवळ भावाचा भुकेला आहे.

(समाप्त)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)’)