संत एकनाथ महाराज यांच्या पादुकांचे फुलांनी सजविलेल्या बसने पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान

पैठण (जिल्हा संभाजीनगर) – आषाढी वारीसाठी संत श्री एकनाथ महाराज यांच्या पादुका राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने ३० जून या दिवशी पाठवण्यात आल्या. नाथ मंदिरातून २० वारकर्‍यांसह पादुकांचे प्रस्थान झाले. गेल्या ४२२ वर्षांची पायी वारीची प्रथा असलेल्या नाथांचा पायी पालखी सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रहित झाला आहे. औपचारिक प्रस्थान झाल्यानंतर गेल्या १८ दिवसांपासून नाथांच्या पादुका गावातील नाथ मंदिरात मुक्कामी होत्या.

रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे आणि पालखी प्रमुख ह.भ.प. रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी मंदिरात पादुकांची आरती केली. आरती झाल्यानंतर मंत्री भुमरे आणि रघुनाथ महाराज यांच्या हस्ते पादुका शिवशाही बसमध्ये ठेवण्यात आल्या. या वेळी उपस्थित भाविकांनी ‘भानुदास एकनाथ’ नामाचा गजर करून बसवर पुष्पवृष्टी केली. ही बस पारंपरिक पालखीस जसे सजवतात, तसे फुले आणि पाने यांनी सजवण्यात आली होती. रस्त्याने जाणार्‍या अनेक भाविकांनी बसचे हात जोडून दर्शन घेतले.