(म्हणे) ‘चिनी आस्थापनांनी ‘पी.एम्. केअर फंड’साठी दिलेला निधी केंद्र सरकारने परत करावा ! – काँग्रेसशासित पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची मागणी

  • चिनी आस्थापनांनी अशा प्रकारचा निधी दिला असेल, तर तो परत करण्याची आवश्यकता काय ? या आस्थापनांनी निधी देऊन भारतावर उपकार केलेले नाहीत. त्यांनी भारतातून कोट्यवधी रुपयांचा नफाही कमावलेला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे !
  • जर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना इतकेच वाटत असेल, तर त्यांनी ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ला चीनकडून मिळालेली देणगी परत करून दाखवावी !

नवी देहली – सीमारेषेवरील तणाव लक्षात घेऊन चिनी आस्थापनांनकडून ‘पी.एम्. केअर फंड’साठी स्वीकारलेला निधी परत करावा, अशी मागणी पंजाबचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी भारताने चीनच्या ५९ ‘अ‍ॅप्स’वर घातलेल्या बंदीच्या पार्श्‍वभूमीवर केली. कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यास भारत सक्षम असून चीनच्या साहाय्याविनाही भारत ही लढाई लढू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी ‘पी.एम्. केअर फंड’ची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी विविध आस्थापने आणि व्यक्ती यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला. त्यात चिनी आस्थापनांचाही समावेश आहे. यामध्ये चीनच्या ‘हुवेई’ आस्थापनाने ७ कोटी, टिक-टॉकने ३० कोटी, शाओमी १० कोटी, तर ओप्पोने १ कोटी रुपयांचे साहाय्य केले आहे.

(म्हणे) ‘आम्ही चीनला माहिती दिलेली नाही ! – टिक-टॉकचे स्पष्टीकरण

भारताने घातलेल्या बंदीनंतर टिक-टॉकने प्रसिद्धीपत्रक काढले असून त्यात म्हटले आहे की, ‘आम्ही चीन सरकारला भारतियांची माहिती दिलेली नाही.’ चीनच्या ‘अ‍ॅप्स’मुळे भारतियांची माहिती चीनमध्ये गेल्याने भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे सांगत भारताने या ‘अ‍ॅप्स’वर बंदी घातली आहे. त्यावर टिक-टॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी म्हटले आहे की, ‘भारत सरकारच्या आदेशाचे आम्ही पालन करत आहोत. आम्हाला याविषयी सरकारच्या संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांशी बैठकीचे निमंत्रण आले आहे. या बैठकीत आम्हाला आमची बाजू मांडण्याची आणि स्पष्टीकरण देण्याची संधी मिळणार आहे.’