कोरोनाचा प्रसार वाढण्यास धोरणात्मक निर्णयातील गोंधळ कारणीभूत ! – अधिवक्ता दीपक पटवर्धन, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, भाजप

रत्नागिरी – कोरोनाचा प्रसार वाढण्याचे कारण धोरणात्मक निर्णयातील गोंधळ हे  आहे. त्यात रत्नागिरीत सुधारणा होईल असे वाटत नाही. त्यामुळे दळणवळण बंदी घोषित करून कितपत नियंत्रण प्राप्त होईल, याविषयी शंकाच आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अधिवक्ता दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली.

अधिवक्ता दीपक पटवर्धन म्हणाले की,

१. ‘टेस्टिंग लॅब’ चालू झाली; पण ‘टेस्ट’ची संख्या अत्यल्प ठेवल्याने कोरोनाचा प्रसार रोखणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचा वेग मंद आहे.

२. बाहेर गावांहून आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवणे बंधनकारक न करता त्यांना घरी शिक्का मारून पाठवणे, ही सर्वार्ंत मोठी चूक आहे. त्यामुळे निर्बंध राहिले नाहीत.

३. रुग्णालयांतील सुविधांमध्ये असणार्‍या त्रुटींवर प्रभावी उपाययोजना होतांना दिसत नाही.

४. ग्रामपंचायतींना बळकट करण्याचे राष्ट्रीय धोरण गुंडाळून ग्रामपंचायतींचे निधी परत मागणे, ही लज्जास्पद गोष्ट या राज्यात घडते आहे.

५. दळणवळण बंदी राजकीय सोयीने वापरण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल, तर अधिक काटेकोर निर्बंध हवेत. केवळ दळणवळण बंदीच्या घोषणांनी फार काही साध्य होणार नाही.

६. जनतेनेही आता जागरूक रहात अधिक सुरक्षित कसे रहाता येईल, यासाठी उपाययोजना आणि शिस्त अंगीकारली पाहिजे.