पराभूत मानसिकता सोडून इतिहासाकडे सकारात्मकपणे पहाण्याची आवश्यकता ! – सरखेल रघुजी राजे आंग्रे

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आयोजित व्याख्यानमालेत ‘भारतीय सागरी परंपरा आणि मराठा आरमार’ या विषयावर मार्गदर्शन !

मुंबई, २९ जून (वार्ता.) – आपली पराभूत मानसिकता सोडून इतिहासाकडे भारतियांनी सकारात्मकतेने पहायला शिकले पाहिजे. आमचे भूभाग आणि जलभाग यांच्या स्वामित्वाची जाणीव स्थानिकांना करून देत छत्रपती शिवाजी महाराज यांनी समुद्राचे महत्त्व ओळखत मराठा आरमार स्थापन केले. मराठ्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ‘राष्ट्रहित सर्वप्रथम’ ही भावना असल्यामुळेच प्रचंड शक्तीशाली शत्रू असतांनाही सागरी आरमार कौशल्य असूनही इंग्रज आणि पोर्तुगीज मराठ्यांना काहीही करू शकले नाहीत, असे विचार कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज सरखेल रघुजी राजे आंग्रे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आयोजित स्वातंत्र्यवीर व्याख्यानमालेत ‘भारतीय सागरी परंपरा आणि मराठा आरमार’ या विषयावर त्यांनी ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे संवाद साधला.

आंग्रे या वेळी म्हणाले, ‘‘आपल्या संस्कृतीत समुद्र उल्लंघन निषिद्ध नव्हते. आपली संस्कृती समुद्रापलीकडे अनेक देशांपर्यंत, पूर्वेकडे व्हिएतनामपर्यंत विस्तारलेली होती. या सागरी परंपरेमुळेही भारतात सोन्याचा धूर निघत होता; मात्र सागरी सीमांविषयी औदासिन्य आल्यानंतरच आपला देश, संस्कृती आणि व्यापार यांवर संकटे आली. भारतीय संस्कृतीने पूर्वेकडील देशात जे पालट घडवले. ते तलवारीच्या जोरावर नव्हे, तर सकारात्मक पद्धतीने. म्हणूनच आपल्या धर्माची प्रतीके तिकडे अजूनही आढळतात; मात्र इंग्रजांनी त्यांची ख्रिस्ती संस्कृती आपल्यावर लादली आणि आपण गुलाम झालो; पण भारताने इतर पूर्वेकडील देशाच्या संस्कृतीत साखर मिसळल्याप्रमाणेच सकारात्मक कार्य केले.’’