कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे गांभीर्याने आणि काटेकोरपणे पालन करून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना

(श्रीसत्‌शक्‍ति) सौ. बिंदा सिंगबाळ

१. कोरोनामुळे सर्वत्र भयावह स्थिती उद्भवल्याने सुरक्षेच्या सूचनांचे पालन करणे अपरिहार्य !

‘सध्या भारतात ‘कोरोना’ या विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दळणवळण बंदीचे नियम शिथिल झाल्यानंतर या विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत आहे. यापूर्वी जी राज्ये अथवा जिल्हे ‘कोरोनामुक्त’ म्हणून घोषित झाले होते, तेथे कोरोनाबाधितांची ये-जा वाढल्याने रुग्णसंख्याही वेगाने वाढत आहे. कोरोनामुळे सर्वत्र भयावह स्थिती उद्भवली असल्याने सर्वांनी शासनाने किंवा प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे गांभीर्याने आणि काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

२. साधकांनो, सद्य:स्थितीत पुढील सूचनांचे पालन कराच !

अ. अत्यावश्यक अथवा अत्यंत तातडी असेल, तरच घरातून बाहेर पडणे, सेवेसाठी बाहेर जाण्यास सांगितले असेल, तर अशा साधकांव्यतिरिक्त अन्य कुणीही सेवेसाठी बाहेर न जाणे, १० वर्षांपेक्षा अल्प आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींनी घराबाहेर न पडणे

आ. एकमेकांकडे अनावश्यक ये-जा न करणे, अनावश्यक प्रवास टाळणे, प्रवास करणे आवश्यक असल्यास त्याचे नियम पाळणे

इ. गर्दीपासून दूर रहाणे, सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) पाळणे, मास्क वापरणे आणि ते वापरतांना नाक अन् तोंड पूर्णपणे झाकले जाईल, याची काळजी घेणे

ई. रोख व्यवहार करण्याऐवजी ‘ऑनलाईन’ व्यवहारास प्राधान्य देणे

उ. वारंवार साबणाने हात धुणे किंवा निर्जंतुकीकरण (‘सॅनिटायझेशन’) करणे

वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ज्या माध्यमातून अन्य व्यक्तींशी संपर्क येईल, अशा बाबी कटाक्षाने टाळाव्यात. यासह ‘आपले आध्यात्मिक उपाय आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित पूर्ण होतील’, याकडे लक्ष द्यावे.

‘साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी संत आणि महर्षि रात्रंदिन विधी, अनुष्ठान आदी करत आहेत. त्यामुळे सर्वांनी योग्य क्रियमाण वापरून आपले, तसेच कुटुंबियांचे स्वास्थ्य चांगले रहाण्यासाठी प्रयत्न करावेत.

साधकहो, ‘एखादी लहानशी चूकही आपल्या, तसेच कुटुंबियांच्या प्राणावर बेतू शकते’, हे लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे गांभीर्याने अन् काटेकोरपणे पालन करा !’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (२९.६.२०२०)