शिक्षकांनी साधना केल्यास सुजाण नागरिक घडवण्यात मोलाचा वाटा उचलू शकतील ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

  • शिक्षकांसाठी ‘ऑनलाईन’ साधना शिबिराचे आयोजन

  • आदर्श शिक्षक बनवण्यासाठी प्रयत्न करणारी सनातन संस्था !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

कोल्हापूर – शिक्षक मुलांच्या जीवनातील गुरु असतात आणि ते विद्यार्थ्याला योग्य दिशा अन् मार्गदर्शन करतात. पालकांच्या शब्दांपेक्षा शिक्षकांचे शब्द विद्यार्थ्यांसाठी बहुमूल्य असतात. विद्यार्थ्यांना येत असलेला अभ्यासाचा अथवा परीक्षेचा ताण केवळ साधनेनेच अल्प होऊ शकतो, ही अनुभूती अनेक साधक शिक्षकांनी घेतली आणि आताही घेत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करून त्यांच्यात मोठ्या प्रमाणात पालट घडवणे शक्य आहे. यांद्वारे  त्यांना प्रामाणिक आणि सुजाण नागरिक सिद्ध करता येईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. नुकतेच सनातन संस्थेच्या वतीने संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या.

या शिबिरासाठी सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, तसेच गोवा राज्यातील असे एकूण १२५ शिक्षक सहभागी झाले होते. शिबिराचा उद्देश सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी सांगितला. शिबिरात काही शिक्षक साधकांनी त्यांचे मनोगत, तर काहींनी शिबिरात काय शिकायला मिळाले, याविषयी सांगितले.

काही शिक्षकांचे अभिप्राय

१. सौ. साधना मोरे, सातारा – आजच्या शिबिरातून विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्षात कोणत्या कृती करवून घ्यायच्या, ते लक्षात आले. मुले आई-वडिलांपेक्षा शिक्षकांचे अधिक ऐकतात. त्यामुळे प्रत्येक शिक्षक साधक झाल्यास ते धर्मावर आधारित शिक्षण देऊ शकतील आणि त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होईल.

२. सौ. वैशाली सुतार, सातारा – शिक्षक भावी पिढी घडवत असल्यामुळे शिक्षकांनाही साधनेची नितांत आवश्यकता आहे.

३. श्री. अनिल पाटील, गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर – आजच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना आणि पालकांना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, हे शिकायला मिळाले.

४. श्री. वामन सावंत, आजरा, जिल्हा कोल्हापूर – साधनेचा विद्यार्थ्यांना होणारा लाभ, एकाग्रतेत होणारी वाढ, बौद्धिक वाढ यांविषयी सांगितलेले उपाय सोपे आणि उपयुक्त वाटले. सहभागी शिक्षकांनी दिलेली माहिती आम्हाला दैनंदिन शिकवण्यासाठी आणि जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरली.

५. जयश्री पाटील – आजच्या परिस्थितीत साधनाच स्थैर्य देऊ शकते, हे शिकायला मिळाले.

६. प्राजक्ता देशपांडे – शिक्षकांवर नेहमीच शाळाबाह्य कामांमुळे ताण असतो. यावर मात कशी करायची, आनंदी कसे रहायचे, हे शिकायला मिळाले. आजच्या आपत्काळात घरी बसून खूप उपयुक्त माहिती समजली.

७. सौ. शिंदे, अंगणवाडी शिक्षिका – शिबिरात सांगितलेल्या गोष्टींचे अनुकरण करून विद्यार्थ्यांकडून त्या करवून घेईन.

८. श्री. विजय बंदिछोडे आणि सौ. प्रभावती बंदिछोडे – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनातून पुष्कळ प्रेरणा मिळाली. शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी तुम्ही शिबिर आयोजित केले, त्याविषयी धन्यवाद !