‘पंचमुखी हनुमानकवच यज्ञाच्या दिवशी आश्रमात आलेल्या वानराच्या रूपात साक्षात् हनुमंताने दर्शन दिले’, असे प.पू. दास महाराज यांनी सांगणे

प.पू. दास महाराज

१. पंचमुखी हनुमानकवच यज्ञ झाल्यावर सायंकाळी आश्रमात एक वानर दिसणे

‘एकदा रामनाथी आश्रमात केलेला पंचमुखी हनुमानकवच यज्ञ दुपारी ४ वाजता संपला. संध्याकाळी ६.१५ वाजता मी पहिल्या मजल्यावरील गच्चीकडे गेले असता, तेथील गच्चीच्या कठड्यावर एक वानर आलेले दिसले. त्याने एक क्षण माझ्याकडे पाहिले आणि क्षणार्धात ते पत्र्यावरून चालत दुसर्‍या बाजूला निघून गेले. ते वानर गच्चीत असतांना त्याचे शेपूट खाली होते आणि ते दुसर्‍या बाजूला जातांना त्याचे शेपूट वीर हनुमानासारखे झाले होते.

२. वानराचे छायाचित्र पाहिल्यावर परात्पर गुरु डॉक्टर आणि प.पू. दास महाराज यांना आनंद होणे

मी त्या वानराचे भ्रमणभाषमध्ये छायाचित्र घेतले आणि नंतर ते परात्पर गुरु डॉक्टरांना पहायला पाठवले. ते पाहिल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाल्याचे आम्हाला कळले. त्यानंतर माझी प.पू. दास महाराज यांच्याशी भेट झाली. तेव्हा मी ते छायाचित्र त्यांनाही दाखवले. त्यांनाही पुष्कळ आनंद झाला. त्यानंतर त्यांनी पुढील विचार व्यक्त केले.

३. वानराचे छायाचित्र पाहिल्यावर प.पू. दास महाराज यांनी व्यक्त केलेले विचार !

अ. ‘‘हे सामान्य वानर नसून दैवी वानर आहे. येथे साक्षात् हनुमंतच येऊन गेले. वानराचा उजवा पाय पुढे असून त्याच्या पायाकडील बाजूचा रंग शेंदरी आहे. ते संथ गतीने दुसर्‍या दिशेने गेले. जातांना त्याने शेपूट उंचावली. सूर्यास्त होण्यापूर्वी त्याने प्रत्यक्ष रामरूपी परात्पर गुरु डॉक्टर निवास करत असलेल्या आश्रमाचे दर्शन घेतले आणि निघून गेले. ही पुष्कळ मोठी अनुभूती आहे.

आ. सूक्ष्मातून चालू झालेला आपत्काळ दूर होण्यासाठी मी पंचमुखी हनुमानकवच यज्ञाचा संकल्प केला होता. त्रेतायुगात विजय पताका लावणे किंवा धर्मजागृतीचे कार्य करणे, यांत विघ्ने आणणार्‍या रावणाच्या नाशासाठी रामरायांचा अवतार झाला होता. आज या कलियुगात हिंदु राष्ट्राची धर्मपताका लागू नये, यासाठी आता अनिष्ट शक्तींच्या माध्यमातून सूक्ष्म आपत्काळाला प्रारंभ झाला आहे.

हा आपत्काळ दूर होण्यासाठी आम्ही ५ यज्ञांच्या माध्यमातून मारुतिरायाला प्रार्थना केली, ‘हे मारुतिराया, तुम्ही वीररूप धारण करून या आपत्काळाला दूर करा. हिंदु राष्ट्राची धर्मपताका लावण्यासाठी रामरूपी श्री गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) साधकरूपी वानरसेनेसह या भूलोकावर अवतार घेतला आहे. या वानरसेनेकडून आणि आम्हा संतांकडून वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची धर्मपताका लावून घ्यावी’, ही तुमच्या चरणी नम्र प्रार्थना !’’

(‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले हे प्रत्यक्ष श्रीराम आहेत’, असा प.पू. दास महाराज यांचा उत्कट भाव आहे. – संपादक)

– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

प.पू. दास महाराज यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता

‘आम्ही केलेली प्रार्थना ऐकून मारुतिरायांनी वानराच्या माध्यमातून वीर रूपात प्रत्यक्ष येऊन आम्हाला प्रचीती आणि आशीर्वाद दिला. आपत्काळाला दूर करायला मारुतिरायांनी वीर रूपच धारण करायला पाहिजे. त्रेतायुगात राम-रावण युद्धाच्या वेळी मारुतिरायाने असेच वीररूप घेतले होते. वानराच्या माध्यमातून मारुतिरायांनी दर्शन दिले, यासाठी आम्ही त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– आपला चरणदास,

प.पू. दास महाराज, रामनाथी गोवा.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक