‘ऑनलाईन गेमिंग’चे संकट

दळणवळण बंदीच्या काळात जनजीवन विस्कळीत झाल्याने ‘ऑनलाईन’ राहून वेळ व्यतित करण्याच्या कालावधीत वाढ झाली, तशी ‘ऑनलाईन’ फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली. विधायक कार्य किंवा अभ्यास यांसाठी ‘ऑनलाईन’ रहाण्यापेक्षाही मनोरंजनासाठी वेळ वाया घालवणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. ‘जिंका लाखो रुपये’ किंवा ‘घरबसल्या कमवा सहस्रो रुपये’ अशा प्रकारे विज्ञापने करून लोकांना भुलवले जाते. संगणकीय ज्ञानाच्या संदर्भात अशिक्षित किंवा अर्धसाक्षर असणार्‍या व्यक्ती अशा संदेशांना बळी पडतात. ‘ऑनलाईन गेमिंग’ (खेळ) हे फसवणुकीचे एक नवीन क्षेत्र उभे राहिले आहे. नाशिकमध्ये एका अविचारी मुलाने ‘ऑनलाईन रमी’ खेळतांना त्याच्या वडिलांचे तब्बल साडेदहा लाख रुपये उडवल्याची घटना समोर आली. एका व्यक्तीला भूमीच्या व्यवहारातून पैसे मिळाले होते; पण दळणवळण बंदीच्या काळात त्यांच्या मुलाने ‘ऑनलाईन रमी’ खेळतांना ते पैसे उडवले. मुलाचा भ्रमणभाष क्रमांक त्याच्या वडिलांच्या बँक खात्याशी ‘लिंक’ होता. मुलाच्या ‘रमी’च्या वेडापायी किती मोठी किंमत चुकवावी लागली, याची कल्पना करू शकतो.

‘ऑनलाईन गेमिंग’च्या माध्यमातून होणारी फसवणूक ही केवळ भारतातील नाही, तर जागतिक समस्या आहे. एका अभ्यासानुसार ‘ऑनलाईन गेमिंग’च्या २० खात्यांपैकी १ खाते हे चोरट्याचे असते. ‘इंटरनेट’ची सुविधा आणि वेग यांमध्ये वाढ झाल्यानंतर भारतातही ‘ऑनलाईन गेमिंग’चा अनेकांना चाळा लागला आहे; पण अशा प्रकारची व्यसने आयुष्याचाच खेळ करू शकतात, याची अनेकांना जाणीव नसते. ‘ऑनलाईन गेमिंग’च्या नादात आयुष्यभराची पुंजी क्षणार्धात व्यय होऊ शकते आणि ती झाल्यानंतर पश्‍चात्तापाविना दुसरा काही मार्ग रहात नाही. त्यामुळे या ‘ऑनलाईन गेमिंग’च्या वाट्याला न जाणे, हेच श्रेयस्कर !

मातीत उतरून खेळा

भारताची संस्कृती आभासी खेळण्याची नसून मातीत उतरून संघभावाने खेळ खेळण्याची आहे. भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने खेळ केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास करण्याचे माध्यम आहे. सध्या विशेषतः शहरी भागांत मैदाने किंवा मोकळ्या जागा यांची अनुपलब्धता असल्याने अनेक घरकोंबडे सिद्ध होत आहेत. पालकांनाही वेळ नसल्याने ते मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी पाल्यांना ‘भ्रमणभाष’ नामक राक्षसाच्या स्वाधीन करतात. तसे व्हायला नको. एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरकर्त्याला अनेक गोष्टी शिकवू शकेल; पण ना संस्कार देऊ शकेल ना मायेचा ओलावा ! ‘ऑनलाईन गेमिंग’च्या मोहमायापासून वाचण्यासाठी ‘ते खेळ काळजी घेऊन खेळणे’ हा मार्ग नाही, तर ‘न खेळणे’ हाच उपाय आहे; कारण हे मायावी जग मनुष्याची बुद्धी कधी भ्रष्ट करेल आणि त्याला आर्थिकदृष्ट्या उध्वस्त करेल, याचा नेम नाही.

– प्रा. (सौ.) गौरी कुलकर्णी, फोंडा, गोवा