कोरोनाच्या अहवालाविषयी शल्यचिकित्सकांनी उलटसुलट सांगितल्याने मृतदेह स्वीकारण्यास नातेवाइकांचा नकार  : मृतदेह २ दिवस शवागृहात पडून

रत्नागिरी जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा !

रत्नागिरी – येथील जिल्हा रुग्णालयात कोंड (राजापूर) येथील प्रौढाचे उपचारादरम्यान निधन झाले. या व्यक्तीचा अहवाल तो कोरोनाबाधित असल्याचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी नातेवाइकांना कळवला; मात्र काही घंट्यांतच अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) असल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त नातेवाइकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर मृतदेह २ दिवस शवागृहातच ठेवण्यात आला. शेवटी येथील राजरत्न प्रतिष्ठानच्या वतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

२३ जून या दिवशी राजापूर कोंड येथील पती-पत्नी जिल्हा रुग्णालयात ताप असल्याने भरती झाले होते. त्यांचे ‘स्वॅब’चे नमुने घेण्यात आले होते. २४ जूनला पत्नीचा अहवाल सकारात्मक, तर पतीचा अहवाल नकारात्मक आला होता. दोघांनाही कोरोना विलगीकरणमध्ये ठेवण्यात आले होते. २६ जूनला या व्यक्तीचे निधन झाले, या वेळी नातेवाइकांना अहवाल सकारात्मक आल्याची माहिती देण्यात आल्याने २ नातेवाईक रुग्णालयात आले होते. या वेळी त्यांना डॉ. चव्हाण यांनी त्या व्यक्तीचे अहवाल नकारात्मक आले आहेत, नजरचुकीने सकारात्मक सांगण्यात आल्याची माहिती दिली. यानंतर संतप्त नातेवाइकांनी ‘आम्ही नेमके कुणावर विश्‍वास ठेवायचा ? गावात सगळ्यांना सकारात्मक अहवाल आल्याची माहिती देण्यात आली, आता तुम्ही नकारात्मक कसे सांगता? गावातील लोकांना आम्ही उत्तर काय द्यायचे, गावातील लोक आमच्यावर संशय व्यक्त करतील, असे सांगण्यात येऊन मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यानंतर नातेवाइकांनी राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी आणि त्यांचे सहकारी रुग्णालयामध्ये गेले, या वेळी डॉ. चव्हाण यांच्या चुकीमुळेच ही घटना घडल्याचे शिंदे यांनी सांगितले.

संबंधितांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येईल ! – जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

नुकत्याच झालेल्या ‘ऑनलाईन’ पत्रकार परिषदेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेत वरील सूत्र एका पत्रकाराने उपस्थित केले होते. त्या वेळी जिल्हा प्रशासनाला जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या प्रकाराविषयी काहीही कळवले नाही, असे  सांगण्यात आले. त्या वेळी मंत्री उदय सामंत यांनी या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला. ‘या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी’, अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना केली. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकाराविषयी संबंधितांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येईल, असे घोषित केले.