गावाकडे गेलेले मेट्रो प्रकल्पाचे काम करणारे शेकडो कामगार पुन्हा कामावर परतले

प्रतीकात्मक चित्र

मुंबई – कोरोनापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी मेट्रो प्रकल्पातील बहुसंख्य कामगार त्यांच्या गावी गेले होते. याचा परिणाम मुंबई शहर आणि उपनगरात चालू असलेल्या मेट्रोच्या कामावर झाला होता; मात्र आता दळणवळण बंदी शिथिल झाल्यानंतर मूळ गावी गेलेले मेट्रो प्रकल्पाचे शेकडो कामगार पुन्हा कामावर आले असून आणखी कामगार गावाहून येऊ लागले आहेत, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सांगितले आहे.

येत्या आठवड्यात बिहार आणि पश्‍चिम बंगाल येथून आणखी २२८ कामगार परत येणार आहेत. मेट्रो मार्गिका ७ च्या कामातील महाराष्ट्र्रात मूळ गावी गेलेले ३८६ कामगार परत आले आहेत, तर महाराष्ट्राबाहेर मूळ गावी गेलेले ११५ कामगार परत आले आहेत. जुलैमध्ये महाराष्ट्रातून १७५ कामगार परत येतील, तर राज्याबाहेरून ७५५ कामगार परत येतील, अशी अपेक्षा प्राधिकरणाने व्यक्त केली आहे.

भुयारी मेट्रो-३ मध्ये १५ सहस्र कामगार काम करत होते. कोरोनामुळे यापैकी अनेक कामगार त्यांच्या मूळ गावी गेले. सध्या ४ सहस्र कामगार काम करत आहेत. कामगारांच्या अभावी हे काम ६ मास मागे गेले आहे.

४ लाख ८१ सहस्र कामगार मुंबईत आले

राज्यात अनेक कामे चालू झाली आहेत. त्यामुळे मुंबईबाहेर गेलेले कामगार पुन्हा मुंबईत येत आहेत. मुंबईत १ ते २५ जून या काळात उत्तरप्रदेशमधून १ लाख ९१ सहस्र ७४१ मजूर, बिहारमधून ८३ सहस्र ५१५, राजस्थानमधून ५८ सहस्र ३६४ , पश्‍चिम बंगालमधून २२ सहस्र ५६५, केरळमधून १७ सहस्र, कर्नाटकमधून १९ सहस्र १०७, तेलंगणामधून ११ सहस्र १७५, पंजाब, हरियाणा आणि देहली येथून ७८ सहस्र ४२४ मजूर मुंबईत आले आहेत.