इतर राज्यांतून येणार्‍यांसाठी कर्नाटक राज्याची नवी नियमावली घोषित

महाराष्ट्रातून येणार्‍यांना २१ दिवस सक्तीचे अलगीकरण

बेळगाव – राज्यातील वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या पहाता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी इतर राज्यांतून कर्नाटक राज्यात येणार्‍या लोकांसाठी शासनाने नवी नियमावली घोषित केली आहे. विशेषकरून महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्‍यांना ७ दिवस सरकारी, तर १४ दिवस घरगुती अलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. इतर राज्यांतून येणार्‍यांना १४ दिवस घरगुती अलगीकरण असणार आहे. या नियमांचा भंग केल्यास संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात येणार आहे.

१. कर्नाटक राज्यात प्रवेश करणार्‍यांची वैद्यकीय पडताळणी केली जाणार आहे. ताप, सर्दी आढळल्यास त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल.

२. सरकारी अलगीकरणातून गरोदर महिला, १० वर्षाखालील मुले, ६० वर्षावरील वृद्ध, गंभीर आजारी, मनोरुग्ण या लोकांना सवलत देण्यात आली आहे.

३. व्यवसायासाठी राज्यात येणार्‍यांनी ७ दिवसांत परत गेले पाहिजे. यासाठी त्यांनी तसा पुरावा देऊन परत जातांना नोंद करणे आवश्यक आहे. व्यवसायासाठी येतांना कोरोना नसल्याचे ४८ घंट्यांच्या आतील वैद्यकीय प्रमाणपत्र आणावे लागेल. प्रमाणपत्र नसल्यास स्वत:च्या व्ययाने कोरोना चाचणी करून घ्यावी लागेल. चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत अलगीकरण कक्षात रहावे लागेल.

४. ‘सेवासिंधू अ‍ॅप’वर राज्यात येण्यापूर्वी नोंदणी आवश्यक असून नंतर शासनाकडून संमतीची आवश्यकता नाही.